भिवंडीत ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
By नितीन पंडित | Published: October 24, 2023 06:14 PM2023-10-24T18:14:05+5:302023-10-24T18:14:24+5:30
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलेले व भिवंडीत पहिल्या बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रमाचे आयोजक लक्ष्मण नामदेव जाधव यांची विशेष उपस्थिती होती
भिवंडी : तालुक्यातील कवाड येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेच्या भिवंडी शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलेले व भिवंडीत पहिल्या बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रमाचे आयोजक लक्ष्मण नामदेव जाधव यांची विशेष उपस्थिती होती.लक्ष्मण जाधव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून धम्मचक्र गतिमान करण्यासाठी सर्व नागरिकांसह महिला व युवकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे व डॉ.बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला.यावेळी विपश्यना साधक व धम्म प्रचारक विनायक जाधव गुरुजी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला व बदलते शैक्षणिक धोरण व भविष्यातील शिक्षणाचे महत्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी आपल्या भाषणात धम्मचक्र प्रवर्तनाच महत्व व गरज समजावून सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी भिवंडी शहापूर मुरबाड पालघर वाडा कामण परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य रोहित जाधव यांनी केले.