मनोरुग्णालयातून ६८ जणांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:14 AM2018-04-10T03:14:34+5:302018-04-10T03:14:34+5:30
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातून अनोळखी मनोरुग्णांना उपचार करून ते बरे झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत त्यांना पोहोचवले जाते.
ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातून अनोळखी मनोरुग्णांना उपचार करून ते बरे झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत त्यांना पोहोचवले जाते. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षभरात ६८ अनोळखी रुग्णांची यशस्वीपणे घरवापसी झाल्याची माहिती मनोरुग्णालयाने दिली.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आजतागायत १४०० हून अधिक मनोरुग्ण उपचारासाठी दाखल आहेत, तर बाह्यरुग्ण उपचारासाठी दररोज नवे २५० च्या आसपास रुग्ण येत असतात. तसेच, रोजचे सरासरी आठ ते दहा मनोरुग्ण दाखल होत असतात. यात अनोळखी रुग्णांचाही समावेश असतो. पोलिसांना एखाद्या ठिकाणी मनोरुग्ण आढळल्यास ते कायदेशीर कार्यवाही करून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करतात. त्या मनोरुग्णाला उपचार दिल्यानंतर त्याच्याकडून हळूहळू कुटुंबीयांची माहिती काढली जाते. त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळवण्याची जबाबदारी मनोरुग्णालयातील सोशल वर्कर यांची असते. या माहितीच्या आधारे हे सोशल वर्कर त्यांच्या नातेवाइकांचा पत्ता मिळवून त्यांच्या कुटुंबीयांना त्याच्याबद्दल कळवतात. तो बरा झाल्यावर पोलिसांमार्फत त्यांना घरी सुखरूप पोहोचवले जाते किंवा त्यांचे नातेवाईक मनोरुग्णालयात येऊन त्यांना घरी घेऊन जातात. वर्षभरात अशा ६८ मनोरुग्णांची घरवापसी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने केली आहे. यात २८ पुरुष, तर ४० महिला मनोरुग्णांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात घरवापसी होणाऱ्या मनोरुग्णांची संख्या अधिक आहे, या महिन्यात १८ मनोरुग्णांची घरवापसी झाली असल्याची माहिती मनोरुग्णालयाने दिली.
महिना पुरुष महिला एकूण
एप्रिल ०१ ०0 ०१
मे 0० ०१ ०१
जून ०0 ०५ ०५
जुलै ०३ ०१ ०४
आॅगस्ट ०0 ०0 0०
सप्टेंबर ०0 ०२ ०२
आॅक्टोबर ०५ ०२ ०७
नोव्हेंबर ०६ ०१ ०७
डिसेंबर ०२ ०४ ०६
जानेवारी ०३ ०४ ०७
फेब्रुवारी ०६ १२ १८
मार्च ०२ ०८ १०
२८ ४० ६८