केडीएमटीच्या ६९ बस निघणार भंगारात; ठराव बहुमताने मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:53 PM2020-11-09T23:53:20+5:302020-11-09T23:53:28+5:30
समितीच्या मते या बस दुरुस्ती करण्याजोग्या असून, त्याचा विचार केला जावा.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बस भंगारात काढण्याचा ठराव सोमवारच्या महासभेत बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. त्यामुळे या बसचा मार्ग मोकळा झाला आहे.
केडीएमटीच्या ६९ बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांच्या काळात महासभेत मांडला होता. मात्र, त्यावेळी या बस भंगारात काढण्यासाठी शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे व सचिन बासरे यांनी जोरदार विरोध केल्याने या विषयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर, नियुक्त केलेल्या समितीने बसचा पाहणीदौरा केला होता.
समितीच्या मते या बस दुरुस्ती करण्याजोग्या असून, त्याचा विचार केला जावा. सोमवारी पुन्हा हा विषय मांडला गेला असता, नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केडीएमटीचे खाजगीकरण करा, तर शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी बसेस दुरुस्ती करा तसेच कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करा. कारण, महापालिकेत विविध कामे कंत्राटी पद्धतीने केली जातात, अशी मागणी केली. त्यावर बस भंगारात काढू नका, या मुद्यावर सचिन व सुधीर बासरे हे ठाम होते.
शिवसेनेचे सभागृह नेते प्रकाश पेणकर या बसेस भंगारात काढा, यावर ठाम होते. शिवसेनेच्या नगरसेवकांत एकमत होत नसल्याने हा विषय मताला टाकण्याची मागणी बासरे यांनी केली. त्यावर भाजपचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते राहुल दामले यांनी बस भंगारात काढण्यासाठी समर्थन असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सचिव संजय जाधव यांनी आवाजी मतदान घेतले. मात्र, नगरसेवकांनी चर्चा करून या ठरावावर खल करणे पसंत केले. मतदानानंतर या बस भंगारात काढण्याचा ठराव मंजूर झाला आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, या बस भंगारात काढण्याऐवजी दुरुस्ती केल्यास १४ कोटींचा खर्च येऊ शकतो. या बस दुरुस्त केल्यास नियमानुसार बीएस-६ चा निकष पूर्ण करू शकत नाही. केडीएमटीला २५ कोटींचा नव्या बसच्या खरेदीसाठी निधी येणार आहे. बस दुरुस्त केल्या तरी त्या चालविण्यासाठी पदे मंजूर नाहीत. आस्थापना खर्च हा आकृतीबंधाच्या निकषांची पूर्तता करीत नाही. पदे भरण्यास मान्यता नाही. हा दुहेरी पेच पाहता या बस भंगारात काढणे, हा पर्याय योग्य असू शकतो. त्यावर निर्णय घ्यावा, असे सूचित केले.