ठाण्यात गोवा निर्मितीचे ६९ लाखांचे बनाव विदेशी मद्य जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: June 25, 2024 08:43 PM2024-06-25T20:43:03+5:302024-06-25T20:43:11+5:30
राज्य उत्पादनच्या भरारी पथकाची कारवाई: तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सोमवारी रात्री पनवेल- मुंब्रा रोडवर केलेल्या धडाकेबाज कारवाईमध्ये ६९ लाखांचे गोवा निर्मित बनावट विदेशी मद्य, दोन मोबाईल आणि एका वाहनासह ८५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोघांना अटक केल्याची माहिती उपायुक्त प्रदीप पवार यांनी मंगळवारी दिली.
ठाण्यातील पनवेल- मुंब्रा रोडवरील पिंपरीगाव भागात परराज्यातील अवैध बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे आणि उपायुक्त डॉ. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २४ जून २०२४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पनवेल मुंब्रा रोडवरील संगिता इलेक्ट्रीक अॅण्ड हार्डवेअर स्टोर या दुकानासमोर सापळा लावला. त्यावेळी निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट, एस. जे. जरांडे तसेच केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नारायण जानकर आणि सागर चौधरी आदींच्या पथकाने सरकारी तसेच खाजगी वाहनाने पनवेल - मुंब्रा रोडवर एका दहा चाकी ट्रकमधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले बनावट विदेशी मद्याचे ९६० बॉक्स हस्तगत केले.
या ट्रकचे चालक मोहम्मद शाहीद हुसेन (२४, रा. कोटला, जि. मेवात, हरियाणा राज्य. ) आणि नासीर सोकत हुसैन (२६ वर्षे, रा.हरियाणा राज्य ) यांना अटक करण्यात आली. या कारवाईत ट्रकमधून ६९ लाखांचे बनावट विदेशी मद्याचे ९६० बॉक्स, दोन मोबाईल आणि वाहतूक करणारा ट्रक असा ८५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शाहीद आणि नासीर यांनी हा माल कुठूल घेतला? तो ते कोणाला देणार होते? त्यांची आणखी टोळी यामध्ये सामील आहे का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.