क्लोरिन गळतीची ७ जणांना बाधा, भार्इंदरच्या अग्निशमन केंद्रातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 05:17 AM2018-01-28T05:17:39+5:302018-01-28T05:17:47+5:30
भार्इंदर अग्निशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाºया क्लोरिन गॅसची गळती होऊन, अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह एकूण ७ जणांना बाधा झाली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केलेल्या तिघा जवानांना शनिवारी घरी पाठविण्यात आले. यांच्या उपचाराचा खर्च पालिका देणार आहे.
मीरा रोेड : भार्इंदर अग्निशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाºया क्लोरिन गॅसची गळती होऊन, अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह एकूण ७ जणांना बाधा झाली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केलेल्या तिघा जवानांना शनिवारी घरी पाठविण्यात आले. यांच्या उपचाराचा खर्च पालिका देणार आहे.
भार्इंदर पश्चिमेस कमला पार्क येथे पालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्र आहे. येथेच पालिकेचा जलकुंभ आहे. यातून पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनचा वापर केला जातो. त्यासाठी मुंबईच्या एक्वाटॅक एंटरप्रायझेस या कंपनीकडून सिलिंडरचा पुरवठा होतो. १६३ किलो वजनाच्या या सिलिंडरमध्ये १०० किलो क्लोरिन असतो. गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास या सिलिंडरमधून क्लोरिनची गळती सुरू झाली. त्यामुळे अग्निशमन दलाचे सब फायर स्टेशन अधिकारी जगदीश पाटील यांच्यासह लीडिंग फायरमन रवींद्र पाटील, फायरमन संतोष मशाळ, संजय म्हात्रे, रोहित पाटील, संतोष पाटील, धनीलाल गावित, चालक हर्षद अधिकारी, तुषार भोईर, पाणीपुरवठा विभागाचे विठ्ठल धोंगडे, व्हॉल्व्हमन उत्तरायन दोराईराज, सुरक्षारक्षक निखिलेश तिवारी यांनी गळती रोखण्यासाठी धाव घेतली.
सिलिंडरच्या तळाकडून गळती होत असल्याने आधी साबण लावून गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर, दोघा जवानांनी सिलिंडरवर सतत पाण्याचा मारा सुरू केला. मात्र, क्लोरिनच्या गळतीमुळे मदतकार्य करणाºया जगदीश पाटील, संजय म्हात्रे, संतोष माशाळ, रोहित पाटील, हर्षद अधिकारी, उत्तरायण, तिवारी यांना रुग्णालयात दाखल केले, तर बाजूला असणाºया रुची टॉवर, कमला पार्क इमारतीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सिलिंडरला जोडलेला पाइप कापून सिलिंडर भार्इंदर पश्चिमेस खाडीत टाकल्याचे अग्निशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडे म्हणाले. सव्वातीन वाजता जवानांनी पुन्हा जाऊन खाडी परिसराची पाहणी केली. कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी शुक्रवारी आले. गळती रोखण्यासाठी केवळ अग्निशमन दलाच्या दोनच जवानांनी मास्क वापरले होते.
भोंगळ कारभाराचा फटका
शुक्रवारी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त डॉ. नरेश गीते आदींनी रुग्णालयात जाऊन जवानांची भेट घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांचे जोखमीचे असलेले काम पाहता, त्याचा १० लाखांचा विमा पालिका काढत असे, पण वर्ष झाले पालिकेने विमाच काढलेला नाही. कर्मचाºयांची मेडिक्लेम सेवाही पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वर्षभरापासून बंद आहे.