फेरमतमोजणीत ७ जण विजयी

By admin | Published: February 24, 2017 07:02 AM2017-02-24T07:02:35+5:302017-02-24T07:02:35+5:30

मतमोजणीच्या वेळी उडालेल्या सावळा गोंधळामुळे सर्वच पक्षांनी नाराजी व्यक्त केली. दिवसभरात झालेल्या फेरमतमोजणीत

7 people won the final round | फेरमतमोजणीत ७ जण विजयी

फेरमतमोजणीत ७ जण विजयी

Next

सदानंद नाईक / उल्हासनगर
मतमोजणीच्या वेळी उडालेल्या सावळा गोंधळामुळे सर्वच पक्षांनी नाराजी व्यक्त केली. दिवसभरात झालेल्या फेरमतमोजणीत सात जण, तर एकाची चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. दरम्यान, सात जणांमध्ये शिवसेनेच्या शुभांगी बहेनवाल, ओमी टीमच्या कविता रगडे, भाजपाच्या कविता गायकवाड, रवी बागुल, आशा बिऱ्हाडे, रवी जग्यासी, साई पक्षाचे रवी गुप्ता यांचा समावेश आहे.
उल्हासनगर प्रभाग क्रमांक १२ अ मधून सुरुवातीला साई पक्षाच्या वीरांगना सिंग यांना विजयी घोषित केले होते. ओमी टीमच्या कविता रगडे यांनी आक्षेप घेतल्यावर झालेल्या फेरमतमोजणीत रगडे यांना विजयी घोषित केले. तर, प्रभाग क्रमांक ३ च्या पॅनलमधील शिवसेनेचे चारही नगरसेवक विजयी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पुन्हा झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर, चरणजित कौर भुल्लर, भाजपाचे रवींद्र बागुल, नाना बिऱ्हाडे यांना विजयी घोषित केले. तसाच प्रकार प्रभाग क्रमांक २० मध्ये झाला. शिवसेनेचे आकाश व विकास पाटील, साई पक्षाच्या पूजा शिरसवर विजयी झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. नंतर, शिरसवर यांच्याऐवजी भाजपाच्या कविता गायकवाड विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ७ मध्येही गोंधळ उडाला. तेथे रिपाइंचे भगावान भालेराव, अपेक्षा भालेराव, भाजपाच्या शुभांगिनी निकम, लक्ष्मी सिंग विजयी झाल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. तर, प्रभाग क्र. ९ मधून भाजपाचे मनोज लासी, डिम्पल ठाकूर, दीपा पंजाबी विजयी झाल्याचे सांगण्यात आले. फेरमतमोजणीत लासी यांच्याऐवजी साई पक्षाचे अजित गुप्ता यांना विजयी घोषित केले.
प्रभागा क्र. ११ मधून साई पक्षाच्या कविता पंजाबी, प्रवीण कृष्णानी, इंदिरा उदासी, जीवन इदनानी विजयी झाल्याचे सांगितल्यावर फेरमतमोजणीची मागणी झाली. त्यात कृष्णानी यांच्याऐवजी भाजपाचे रवी जग्यासी यांना विजयी घोषित केले. पक्ष प्रतिनिधी व राजकीय नेत्यांमुळे गोंधळ उडाल्याने असे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मतमोजणी नियमानुसार झाल्याची प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे.

काँग्रेस गटनेत्यांचा पराभव
उल्हासनगरमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पॅनल क्रमांक १७ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. हीच लढत काँग्रेसला भारी पडली. काँग्रेसच्या गटनेत्या जया साधवानी आणि त्यांचे पती मोहन साधवानी यांचा या मैत्रीपूर्ण लढतीत पराभव झाला. सर्व शहरात आघाडी झालेली असतानादेखील या पॅनलमध्ये काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत करून स्वत:चे अस्तित्व धोक्यात घातले. या प्रभागात आघाडी झाली असती, तर काँग्रेसलादेखील या ठिकाणी विजयाचा हिस्सा मिळाला असता.


काँग्रेसचा एकच नगरसेवक
उल्हासनगरमध्ये काँग्रेसचे पूर्वी ८ नगरसेवक होते. मात्र, ६ नगरसेवकांनी इतर पक्षांत प्रवेश केल्याने केवळ काँग्रेसकडे दोनच नगरसेवक होते. त्यातील एक नगरसेविका पडली असून उर्वरित एक नगरसेविका असलेल्या अंजली साळवे यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसला उल्हासनगरमध्ये खाते उघडता आले आहे. ज्या प्रभागातून साळवे निवडून आल्या, त्या पॅनलमध्ये कोणत्याही एका पक्षाला झुकते माप मिळालेले नाही. त्यातही काँग्रेसने ही जागा पुन्हा राखल्याने काँग्रेसचे अस्तित्व टिकून आहे.

चिठ्ठी काढून दिला निकाल
च्उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल क्रमांक १८ क मध्ये शिवसेनेच्या सविता दिवटे आणि भारिपच्या कविता बागुल यांना समान मते मिळाली.
च्आधी कविता बागुल यांना विजयी घोषित केले होते. मात्र, नंतर पुनर्मतमोजणी झाल्यावर या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याचे समोर आले.
च्समान मते मिळाल्याने या दोन्ही उमेदवारांचा निकाल चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आला. त्यात कविता बागुल यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

बीएसपी आणि मनसेला भोपळा : गेल्या पालिका निवडणुकीत बीएसपीने २ जागांवर विजय मिळवत सर्वांना धक्का दिला होता. तर, मनसेनेदेखील एक जागा जिंकत आपले अस्तित्व निर्माण केले होते. मात्र, या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या हाती निराशा आली. बीएसपी दोनवरून थेट शून्यावर आली आहे, तर मनसेलादेखील आपला १ चा आकडा कायम ठेवता आलेला नाही.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीने खाते उघडले
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक १८ ब मध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीने आपले खाते उघडले आहे. या निवडणुकीत सुभाष टेकडी परिसरात दलित वस्तीत कोणाला विजय मिळेल, याची शाश्वती कोणालाच नव्हती. मात्र, या निवडणुकीत प्रमोद टाले यांनी विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या विजयामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीने या शहरात आपले खाते उघडले आहे.

Web Title: 7 people won the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.