७ हजार कामगारांना दिवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:08 AM2018-11-03T00:08:41+5:302018-11-03T00:08:57+5:30
दिवाळीची लगबग सुरू असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सात हजार कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य करण्यात आल्या.
ठाणे : दिवाळीची लगबग सुरू असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सात हजार कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य करण्यात आल्या. कंत्राटी कर्मचाºयांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम देण्याचा, सहाव्या वेतन आयोगातील त्रुुटी दूर करण्याचा, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा, विविध भत्ते लागू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. परिवहनसेवेच्या ६१३ कर्मचाºयांना एक महिन्यात नियमित करण्याचा निर्णयही घेतला. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर १०० कोटींचा बोजा पडणार आहे.
आयुक्तांनी शुक्रवारी संयुक्त बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे २०६ कुशल आणि १५४६ अकुशल कामगार, आरोग्य विभागाकडील २३२ कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग, मलनि:सारण विभाग या ठिकाणी काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांना फेब्रुवारी २०१५ ते ३१ आॅक्टोबर २०१६ या कालावधीतील किमान वेतन कायद्यानुसार मिळणारी फरकाची रक्कम पाच हप्त्यांत देण्याचा निर्णय घेतला. पहिला हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील कर्मचाºयांनाही सरळसेवा नियुक्तीप्रमाणे देय असलेल्या पगाराच्या ६० टक्के किंवा किमान वेतन कायद्यानुसार जे जास्त असेल, ते वेतन देण्याचा निर्णय घेतला.
स्थायी कर्मचाºयांच्या ग्रेड पेमधील त्रुटी दूर करून सुधारित नियमानुसार वेतन निश्चित करण्यात येणार आहे. याचा जवळपास सातहजार कर्मचाºयांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांच्या वेतनत्रुटी समितीच्या अहवालानुसार तांत्रिक पदांची वेतनश्रेणी राज्य शासनाच्या धर्तीवर सुधारित करणार, तसेच आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. अग्निशमन दलातील कर्मचाºयांना त्यांची जबाबदारी विचारात घेऊन उच्च वेतनश्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘अस्थायीं’ना दिलासा
कर्मचाºयांना विशेष पूरकभत्ता, वैद्यकीयभत्ता, वाहतूकभत्ता, अपंग महिला कर्मचारी विशेष भत्ता, देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. ठाणे परिवहनसेवेतील ६१३ अस्थायी कर्मचाºयांना एका महिन्यात नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.