संतापजनक! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कँटीन चालकाकडून लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 05:28 AM2024-08-25T05:28:35+5:302024-08-25T05:28:56+5:30
नायगाव पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्याकडून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती नायगावमधील एका शाळेत घडल्याचे उघडकीस आले आहे. या शाळेच्या उपहागृहात काम करणार्या १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने ७ वर्षांच्या चिमुकलीवर ४ ते ५ वेळा लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे.
पीडित मुलगी या शाळेत दुसर्या इयत्तेत शिकते. २२ ऑगस्टला ती शाळेतील कॅंटीनमध्ये जाण्यास तयार नव्हती. कॅंटीनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो असे तिने शिक्षिकेला सांगितल्यानतंर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापकांना सांगितला. त्यांनी लगेच या मुलीची विचारपूस केली तेव्हा मागील १५ दिवसांमध्ये शाळेच्या कॅंटीनमध्ये काम करणारा १६ वर्षीय तरुणाने शाळेच्या मधल्या सुट्टीच्या वेळेत ४ ते ५ वेळा हात पकडून कॅंटीनमध्ये खेचून अश्लील चाळे करून घाणेरडे हावभाव करत लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले.
एकदा पीडित मुलीने आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती. परंतु त्यांनी तेव्हा गांभीर्याने घेतले नव्हते. मुख्याध्यापकांनी त्वरीत याबाबतची माहिती शुक्रवारी नायगाव पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.