उल्हासनगरात शिक्षकांकडून ७ वर्षाच्या मुलीचा विनयभंग, शिक्षक गजाआड
By सदानंद नाईक | Published: September 13, 2024 06:52 PM2024-09-13T18:52:11+5:302024-09-13T18:52:28+5:30
न्यायालयाने शिक्षकाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहर पूर्वेतील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकाने ७ वर्षाच्या मुलीचा शाळेच्या हद्दीत विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी गुरवारी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शिक्षकाला अटक करण्यात आली. न्यायालयाने शिक्षकाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उल्हासनगर पूर्वेतील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली कक्षात ७ वर्षाची मुलगी शिक्षण घेते. बदलापूर घटनेने सतर्क झालेल्या एका मुलीच्या पालकाने गणेशोत्सवाच्या सुट्टीत मुलीला बोलते केले असता, शिक्षक चुकीच्या ठिकाणी स्पर्श करीत असल्याचे मुलीने सांगितले. या प्रकाराने पालकांना धक्का बसला असून त्यांनी शाळा प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी गुरवारी हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विनयभंग व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच शिक्षकाला अटक केली. न्यायालयाने शिक्षकाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनाविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. तसेच हा प्रकार ६ सप्टेंबर पूर्वी म्हणजे गणेशोत्सव सुट्टीपूर्वी झाला आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस अधिकारी जगताप यांनी दिली. दरम्यान शाळांना गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने शाळा प्रशासनासी संपर्क झाला नाही.
बदलापूर-अंबरनाथनंतर उल्हासनगर?
बदलापूर शाळेतील मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूर व अंबरनाथ मध्ये अत्याचाऱ्याच्या अनेक घटना लागोपाठ घडल्या. त्यानंतर उल्हासनगरात महिला पत्रकारावर अत्याचार झाल्याच्या घटनेला एक दिवस उलटत नाही, तोच ७ वर्षाच्या मुलीचा शिक्षकांनी विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.