ठाण्यातील ७० इंडियन स्टार कासवांना मिळाली चंद्रपूरच्या उद्यानातील सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:15 PM2021-01-05T23:15:44+5:302021-01-05T23:21:07+5:30
विविध ठिकाणी घातलेल्या छापेमारीतून जप्त केलेले इंडियन स्टार प्रजातीच्या तब्बल ७० कासवांना चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यानात निसर्ग निसर्गमुक्त केल्याची माहिती मंगळवारी ठाणे वनविभागाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विविध ठिकाणी घातलेल्या छापेमारीतून जप्त केलेले इंडियन स्टार प्रजातीच्या तब्बल ७० कासवांना चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यानात निसर्ग निसर्गमुक्त केल्याची माहिती मंगळवारी ठाणेवनविभागाने दिली. एका खास रुग्णवाहिकेतून त्यांचा ठाणे ते चंद्रपूरचा हा सुखरुप प्रवास झाला.
ठाणे वन विभागात विविध कारवाईमध्ये जप्त केलेल्या इंडियन स्टार प्रजातीची ७० कासव ठाणे वन परिक्षेत्रातील डायघर येथील वन्यजीव पारगमन केंद्रात देखरेखीसाठी ठेवली होती. ठाण्यातील मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांच्या संस्थेच्या मदतीने त्यांच्या वन्यप्राणी रुग्णवाहिकेमधून या कासवांची ३ जानेवारी २०२१ रोजी ठाणे ते चंद्रपूर जिल्हयातील ताडोबापर्यंत सुरक्षितपणे वाहतूक केली. त्यानंतर ४ जानेवारी रोजी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना या उद्यानात निसर्ग मुक्त करण्यात आले.
या कासवांची चंद्रपूरपर्यंत सुरक्षितपणे वाहतूक करण्याची जबाबदारी ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई, वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे आदींच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनोज परदेशी, वनमजूर संतोष भागणे, मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा आदींनी पार पाडली.