भारतातील ७० टक्के लोकं शेवटच्या टप्यातील कर्करोगावर उपचार करतात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 06:39 PM2017-07-25T18:39:46+5:302017-07-25T18:39:50+5:30
कर्करोगावर वेळीच उपचार आणि निदान ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. परंतु, भारतामध्ये ७० टक्के नागरिक कर्करोगाच्या तिसऱ्या अथवा चवथ्या या शेवटच्या टप्पात उपचार सुरु करीत असल्याची माहिती
- राजू काळे
भाईंदर, दि. 24 - भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आधुनिक जीवनशैलीमुळे या रोगाने चांगलेच हातपाय पसरविले आहेत. कर्करोगाचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत.कर्करोगावर वेळीच उपचार आणि निदान ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. परंतु, भारतामध्ये ७० टक्के नागरिक कर्करोगाच्या तिसऱ्या अथवा चवथ्या या शेवटच्या टप्पात उपचार सुरु करीत असल्याची माहिती मीरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कर्करोग तज्ञ डॉ. उमा डांगी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ इमरान शेख तसेच व्हेरिकोज व्हेन्सचे तज्ञ डॉ हिमांशू शहा यांनी एका शिबिरात दिली. डॉ. उमा डांगी यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, शरीर शुद्ध ठेवण्यासाठी आपल्या शहरीरातील पेशींची नियंत्रित वाढ आणि विघटन होणं आवश्यक असतं. काही पेशी वृद्ध किंवा खराब होतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात. परंतु या नवीन पेशींची वाढ विशिष्ट अवयवांत असंतुलित आणि अनियमित होते. त्यावेळी त्या अवयवाला कर्करोग झाल्याचे निदान होते. शरीराच्या कोणत्याही भागाला कर्करोग होऊ शकतो. तेथून तो इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाबद्दल दुर्दैवाची गोष्ट अशी की, कर्करोग पहिल्या स्टेजला असेल तर त्याची लक्षात येण्यासारखी लक्षणं फार थोडी असतात. त्यात शरीरावरील अथवा शरीरामध्ये गाठ आणि जखम बरी न होणे, सतत खोकला, तसेच कफातून बाहेर येणारं रक्त, आवाजात बदल होणे, गिळण्यास त्रास होणे, वजन घटणे, भूक न लागणे, रक्त किंवा पांढरा स्त्राव अंगावरून जाणे, लघवी आणि शौचामध्ये बदल या लक्षणांचा समावेश आहे. रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवानी यांनी सांगितले कि, कर्करोग झाला आहे असं कळल्यावर सामान्य माणसाच्या मनात या आजाराविषयी प्रचंड भीती निर्माण होते. या भीतीपोटीच त्यांचे मानसिक, शारीरिक खच्चीकरण होते. त्यातून त्याची उपचारांना प्रतिकार करण्याची क्षमता नष्ट होऊ लागते. परिणामी रुग्ण दगावतो. म्हणूनच कर्करोगाशी दोन हात करण्यासाठी त्याची माहिती रुग्णांनी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांना त्याचा सामना योग्य प्रकारे करता येतो.