राष्ट्रवादीचे ७० टक्के नगरसेवक शिवसेना प्रवेशासाठी रांगेत उभे
By Admin | Published: January 26, 2017 03:15 AM2017-01-26T03:15:53+5:302017-01-26T03:15:53+5:30
बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यांचे तब्बल ७० टक्के नगरसेवक शिवसेनेत प्रवेश
ठाणे : बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यांचे तब्बल ७० टक्के नगरसेवक शिवसेनेत प्रवेश मिळवण्यासाठी रांगेत उभे असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि महापौर संजय मोरे यांनी केला. शिवसेनेच्या विकासाच्या झपाट्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सैरभैर झाल्याचे सांगून त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन ते बेलगाम आरोप करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मात्र, शिवसेनेवर वाट्टेल ते आरोप करण्याआधी ठाण्याच्या विकासकामांमध्ये अडथळे आणायचे पाप कोणी केले, त्याचे उत्तर आव्हाड यांनी जनतेला द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला कचरा, डम्पिंग, पाणी, धरण आदी मुद्यावरून धारेवर धरले असताना आता शिवसेनेनेही त्यांना आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.
घनकचरा व्यवस्थापन, क्लस्टर डेव्हलपमेंट, धरण, मेट्रो अशा प्रत्येक उपक्र मात राजकारण करून मोडता घालण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात कोणी केले, असा सवाल त्यांनी या वेळी केला. डायघर येथे प्रकल्पाचा पूर्ण आराखडा शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पालिकेने तयार केला होता. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण न होणारा हा प्रकल्प होता. या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे काम राष्ट्रवादीच्या कुठल्या मंत्र्याने केले, याचे उत्तर आधी आव्हाड यांनी द्यावे, असेही म्हस्के म्हणाले.
धरणांच्या बांधकामातील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीच्या किती मंत्र्यांची चौकशी सुरू आहे, याचाही जाब त्यांनी द्यावा. ज्या शाई आणि काळू धरणाच्या नावाने आज आव्हाड खडे फोडत आहेत, त्या धरणांची कामे कुठल्याही मंजुऱ्या न घेता राष्ट्रवादीच्या जलसंपदामंत्र्यांनी कोणाचे भले करण्यासाठी सुरू केली, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. केवळ कंत्राटदारांकडून मलिदा खायला मिळावा, यासाठीच नियमबाह्य पद्धतीने या धरणांची कामे सुरू केल्यामुळे ही कामे आज न्यायालयीन लढाईत सापडली असल्याचे ते म्हणाले.
रेतीबंदर चौपाटीचे श्रेय घेण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा केवळ हास्यास्पदच नसून केविलवाणा आहे, अशी टीका महापौर संजय मोरे यांनी केली. त्यांना खरोखरच इच्छाशक्ती असती तर ५ वर्षांत अशा कितीतरी चौपाट्या ठाण्याच्या खाडीकिनारी करता आल्या असत्या, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाण्यात आज मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन झाले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने ठाण्यात मेट्रो व्यवहार्य नाही, असे सांगितले होते. तेव्हा आव्हाडांनी आपल्या सरकारला मेट्रोची गरज का पटवून दिली नाही.