७० टक्के करून दाखवलेच नाही

By admin | Published: January 10, 2017 06:49 AM2017-01-10T06:49:41+5:302017-01-10T06:49:41+5:30

ठाणे महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात

70 percent is not shown | ७० टक्के करून दाखवलेच नाही

७० टक्के करून दाखवलेच नाही

Next

अजित मांडके / ठाणे
ठाणे महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेल्या ‘वचनपूर्ती’ आणि ‘माझे ठाणे, सबकुछ ठाणे’ या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ७० टक्के आश्वासनांची गेल्या पाच वर्षांत पूर्तता झालेली नाही. काही कामांच्या निविदा निघाल्या आहेत, तर काही कामांची तेवढीही प्रगती झालेली नाही. ‘मोनो रेले’, ‘मनोरंजन केंद्र’, ‘तारांगण’, ‘इनडोअर स्टेडिअम’यासह अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी आजही कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे ‘करून दाखवले’ असे म्हणणाऱ्या शिवसेनेला ‘कधी करून दाखवणार’, असा सवाल करण्याची वेळ ठाणेकरांवर ओढवली आहे.
शिवसेनेच्या वचननाम्यात २४ तास पाणी, रस्ते, वाहनतळ, पदपथ चौक, सार्वजनिक आरोग्य सुविधा, उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देऊ शकणाऱ्या खाजगी संस्थांना रुग्णालय उभारण्यास पालिकेचे आरक्षित भूखंड उपलब्ध करून देणे, अशी आश्वासने दिली होती. याखेरीज, शैक्षणिक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पुनर्विकास, घनकचरा, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व बालकल्याण, मैदान, उद्याने, क्रीडांगणे, नाट्यगृह, उद्योग, कामगार, अपारंपरिक ऊर्जास्रोत, नागरी प्रशासनात अधिकाधिक लोकसहभाग आदी जुन्या वचननाम्यातील बाबी नवा मुलामा देऊन समाविष्ट केल्या होत्या. यापैकी अनेक गोष्टी सत्ताधाऱ्यांना ठाणेकरांना उपलब्ध करून देता आलेल्या नाहीत.
मागील कित्येक वर्षे ज्वलंत असलेला डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अद्यापही सत्ताधाऱ्यांना सोडवता आलेला नाही. डायघरची जागा जरी ताब्यात असली, तरी त्याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारता आलेला नाही.
केवळ याला पर्याय म्हणून खर्डी येथील वनविभागाच्या जागेवर कचरा टाकण्यासाठी वनविभागाची अंतिम परवानगी मिळणे अद्यापही बाकी आहे.
पालिका प्रशासनाने विविध प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काही प्रकल्प हाती घेतले असून यातील काही प्रकल्पांची कामे सुरूझाली आहे.

ठाणेकरांसाठी २४ तास पाण्याचे नियोजन करण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांनी दाखवले होते. परंतु, अद्यापही ते प्रत्यक्षात उतरवता आलेले नाही. नळावर मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्यासंदर्भातील काम निविदेच्या पुढे सरकू शकलेले नाही. पाण्याचे नियोजन करण्यासाठी मात्र वॉटर मीटर, वॉटर की-आॅक्स, वॉटर आॅडिट याबाबत निविदा आता काढल्या जात आहेत.

वाहनतळांची समस्या अद्यापही तशीच आहे. ज्युपिटरजवळ बहुमजली पार्किंग सेंटर उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. इतर ठिकाणीदेखील तशा स्वरूपाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, त्याची गाडी म्हणावी तितकी पुढे सरकू शकलेली नाही. गावदेवी मैदानाखाली भुयारी पार्किंगचे घोडेही फारसे पुढे सरकलेले नाही.

तारांगणचे काम कागदावरून फारसे पुढे सरकू शकलेले नाही. आॅस्ट्रेलियातील सिडनीच्या धर्तीवर कासारवडवली येथे ३० एकरांवर अत्याधुनिक इनडोअर स्टेडिअम उभारणाचे आश्वासन हरवले आहे.

अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यालय उभे
राहिलेले नाही.

शासनाच्या सहकार्याने घोडबंदर परिसरात ३२० एकरांच्या जागेवर मनोरंजन केंद्र उभारणार, हे आश्वासन कागदावर आहे.

युवकांना रोजगार, करिअरविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विशेष केंद्र उभारणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, तेही कागदावरच राहिले आहे.

अद्ययावत भाजी व मच्छी मार्केट उभारणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, विद्यमान भाजी मंडई आणि मच्छी मार्केटची अवस्था सुधारण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. त्यात घोडबंदर भागातील भाजी मंडईचे रूपांतर एसआरएच्या कार्यालयात झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
नागरी प्रशासन अधिकाधिक लोकसहभाग व्हावा आणि नागरिकांच्या समस्या या नगरसेवक पातळीवर सोडवल्या जाव्यात, यासाठी नगरसेवक प्रभाग सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही एकाही सभेचे आयोजन झालेले नाही.
बेकायदा होर्डिंग्जपासून ठाणे मुक्त करणार असल्याचे सांगितले असले, तरी सध्या सत्ताधारी शिवसेना व भाजपामध्ये श्रेयासाठी पोस्टर वॉर सुरू असल्याने आपल्याच वचनाचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे.

विटावा येथील रहिवाशांना रिक्षाने स्टेशनकडे येण्यासाठी खिशाला चाप बसत असल्याने आणि पाच मिनिटांच्या प्रवासासाठी वळसा घालून जावे लागत असल्याने सिडको बस स्टॉप ते छत्रपती शिवाजी रुग्णालय असा पादचारी पूल बांधण्यासाठी आता कुठे निविदा काढण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक भवनांची संख्या वाढवणार व त्यांच्यासाठी विशेष उपक्रम राबवणार, हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. भवनांची संख्या वाढलीच नाही आणि त्यांच्यासाठी फारसे नवे असे काहीच उपक्रम राबवले नाहीत. आजीआजोबा पार्कची संख्याही वाढू शकलेली नाही. महिलांना गृहउद्योग उभारण्यासाठी सावित्रीबाई फुले योजनेलाही फारशी गती अद्याप मिळू शकलेली नाही.

ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला मेट्रोच्या कामाचा नारळ मात्र २४ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण्यात आला आहे. परंतु, त्याचे काम केव्हा पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे. महापालिका मोनो रेल्वे प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, ती आजही कागदावरच आहे.

कळवा रुग्णालयात आजही रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. त्यात, महापालिका रुग्णालयात सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा कक्ष सुरू करणार असल्याचा दावा केला होता. तो कक्ष गेला कुठे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या २५ वरून पुढे सरक शकलेली नाही.

Web Title: 70 percent is not shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.