ठाण्यातील ७० उद्याने सुस्थितीत, ४० उद्यानांची करावी लागणार पूर्ण डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:47 PM2018-02-08T15:47:45+5:302018-02-08T15:51:39+5:30
ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्व्हेत शहरातील ७० उद्याने ही सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ४० उद्यानांची पूर्णपणे डागडुजी करावी लागणार आहे. तसेच २० उद्यानांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे.
ठाणे - शहरातील सर्वच उद्याने चांगल्या स्थितीत राहावीत, त्या उद्यानात देण्यात येणाऱ्या सोई, सुविधा उत्तम राहाव्यात या उद्देशाने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरातील या सर्वच उद्यानांचे सर्व्हे करुन त्याचा कृती आराखडा सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या. परंतु महिना उलटूनही हा सर्व्हे झाला नव्हता. अखेर आता उद्यान विभागाकडून हा सर्व्हे पूर्ण झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील १३० पैकी ७० उद्याने ही उत्तम स्थितीत असल्याचा दावा करण्यात आला असून ४० उद्यानांची संपूर्ण डागडुजी करावी लागणार आहे. तर २० उद्यानांची किरकोळ डागडुजी करावी लागणार असल्याची माहिती उद्यान विभागाने सर्व्हेत नमुद केली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत छोटी - मोठी मिळून अशी १३० उद्याने आहेत. परंतु त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच उद्याने चांगल्या स्थितीत असतील असा अंदाज बांधला जात होता. परंतु, उद्यान विभागाने केलेल्या सर्व्हेत तब्बल ७० उद्याने ही उत्तम स्थितीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात मोठ्या उद्यानांचाच अधिक समावेश असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. परंतु ४० उद्यानांची ही पुर्णपणे दैना उडाली असून या उद्यानांची १०० टक्के डागडुजी करावी लागणार असल्याचे या सर्व्हेत समोर आले आहे. त्यानुसार येथे थेट कपांऊड वॉल पासून नवीन खेळाचे साहित्य,पाण्याची सोय, विद्युत व्यवस्था, शौचालय आदी सर्वच सुविधा नव्याने निर्माण कराव्या लागणार आहेत. दरम्यान या उद्यानांना पुन्हा नवी झळाळी मिळावी या उद्देशाने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर महिन्यात एक बैठक पार पडली होती. या बैठकीत शहरातील सर्व उद्याने, तलावालगत असलेली उद्याने, विकसित करण्यात आलेली हरित जनपथ आदी सुविधा नागरीकांना वापरण्यास अधिकाधिक चांगल्या पध्दतीने मिळावे यासाठी त्यांचे जतन करणे, निगा देखभाल करणे या दृष्टीने बांधकाम विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता, सर्व्हेअर, पाणी पुरवठा अभियंता, विद्युत अभियंता यांचे पथके नगर अभियंता यांच्या मार्फत तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या पथकांमार्फत सर्वेक्षण करावे व त्या आधारावर पुढील तीन महिन्यात सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा अशा सुचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु त्याला चालनाच मिळाली नव्हती. अखेर उद्यान विभागाकडून त्यांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आता यासाठी किती खर्च येणार याचा अंदाज बांधकाम विभागाला बांधवा लागणार आहे. परंतु पालिकेच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या उद्यानांच्या दुरुस्तीसाठी साधारणपणे ५ कोटींच्या आसपास खर्च येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.