70 हजारांचा वन प्लस मोबाईल 20 हजारात, तरुणाने तरुणीला फसवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 10:09 AM2021-09-17T10:09:35+5:302021-09-17T10:10:01+5:30
शिर्डी नगरमध्ये राहणाऱ्या गायत्री रावत हिची मैत्रीण अंजली शाहुने चिराग पटेल रा. रामनगर, शिर्डीनगर, भाईंदर पुर्व ह्याच्याशी तिची ओळख करुन दिली होती.
मीरारोड - आपण मोबाईल कंपनीत कामाला असून स्वस्तात मोबाईल देतो सांगून एका तरुणीच्या नावाने हप्त्याने मोबाईल खरेदी करण्यासह तिच्याकडून पैसे उकळणाऱ्या भामट्या विरुद्ध भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिर्डी नगरमध्ये राहणाऱ्या गायत्री रावत हिची मैत्रीण अंजली शाहुने चिराग पटेल रा. रामनगर, शिर्डीनगर, भाईंदर पुर्व ह्याच्याशी तिची ओळख करुन दिली होती. मोबाईल कंपनीत कामाला असून महागातले फोन स्वस्तात मिळवुन देईन, असे चिरागने सांगितल्यावर गायत्रीने वन प्लस मोबाईल बाबत विचारले. ७० हजारांचा मोबाईल २० हजारात मिळेल व बाकीचे पैसे कंपनी भरेल, असे चिरागने सांगितले. तिने चिरागला ११ हजार रोख दिल्यावर जो मासिक हफ्ता येईल त्यातील आर्धी रक्कम ही कंपनी भरणार असे त्याने सांगितले. गायत्रीने रोख रक्कमेसह तिचे आधारकार्ड पॅनकार्ड व आईचे नावे असलेले बजाज फायनान्सचे कार्ड चिरागला दिले. त्यानंतर ती मोबाईलबाबत विचारणा करू लागली असता तो सातत्याने कारणे सांगत टाळाटाळ करू लागला.
दरम्यान, याबाबत गायत्रीने अंजलीला विचारले असता, चिरागने माझ्यासह बऱ्याच जणांना फसवल्याचे तिने सांगितले. चिरागने गायत्रीच्या नावे वन प्लसऐवजी महागडा आयफोन हा मासिक हफ्त्यावर घेतल्याचे समजले. तिच्या खात्यातून मोबाईलचा मासिक ९ हजार ५०० रुपयांचा हप्तासुद्धा कापला गेला. मोबाईल मिळाला नाही, दिलेले पैसे मिळाले नाहीत वर बँकेतून हप्ता कापला जाऊ लागल्याने गुरुवारी गायत्रीने नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी चिराग पटेल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.