पूरग्रस्तांच्या मदतीकरिता ७० वर्षांच्या आजीबाईंची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:37 AM2021-08-01T04:37:16+5:302021-08-01T04:37:16+5:30
कल्याण : कोकण, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवलीमधील ७० वर्षांच्या ज्योती खवसकर व उषा विष्णू वझे या आजीबाई अन्नधान्याचे किट ...
कल्याण : कोकण, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवलीमधील ७० वर्षांच्या ज्योती खवसकर व उषा विष्णू वझे या आजीबाई अन्नधान्याचे किट तयार करीत आहेत. इच्छाशक्तीच्या जोरावर या आजींनी आपल्या वयाला मागे सारत सेवेला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. या दोन्ही आजींचे तोंडभरून कौतुक मनसे आमदार राजू पाटील यांनी केले. या आजी आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात आणि त्यांचा आम्हाला धाक असतो, असे पाटील म्हणाले.
डोंबिवलीमधील टिळकनगर परिसरात राहणाऱ्या ज्योती खवसकर आणि गोग्रासवाडीमध्ये राहणाऱ्या उषा विष्णू वझे या डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी आहेत. मनसे महिला पदाधिकारी खांद्याला खांदा लावून पूरग्रस्तांकरिता अन्नधान्याचे किट तयार करीत आहेत. त्यामध्ये या ७० वर्षांच्या दोन ‘तरुणी’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. खवसकर या महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयात काम करीत होत्या. ३० वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी मनसेचे काम सुरू केले तर, वझे या पेशाने शिक्षिका होत्या.
डोंबिवली मनसे महिला अध्यक्ष मंदा सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १५० पेक्षा अधिक अन्नधान्याचे किट तयार केले आहेत. त्यामध्ये अन्नधान्यासह विविध प्रकारचे साहित्य आहे. शनिवारी रात्री अन्नधान्याचे किट घेऊन टेम्पो पूरग्रस्त भागाकडे रवाना झाला.
फोटो-डोंबिवली -कोकण मदत
.............
वाचली.