पोलीस कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे वाचले ७० वर्षीय आजीबाईंचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:28+5:302021-03-07T04:37:28+5:30
ठाणे : ठाणे शहरातील एकट्यादुकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची आपुलकीने विचारपूस करण्यापासून ते त्यांच्या औषधोपचारांची योग्य काळजी घेण्याचे काम ठाणे ...
ठाणे : ठाणे शहरातील एकट्यादुकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची आपुलकीने विचारपूस करण्यापासून ते त्यांच्या औषधोपचारांची योग्य काळजी घेण्याचे काम ठाणे शहर पोलीस चोख करीत आहे. त्याची प्रचीती नुकत्याच एका घटनेवरून आली आहे. ठाण्यात राहणाऱ्या परंतु गावी कोकणात गेलेल्या ७० वर्षीय आजीबाईं तोल जाऊन पडल्यानंतर त्यांनी कोणताही विचार न करता थेट ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनचे संजीवन राणे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी राणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तेथील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून ठाणे येथे पाठविण्यास सांगितले. त्यावेळी दुसरीकडे त्यांनी ठाण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले.
ठाणे पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकट्यादुकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची काळजी घेण्याबरोबरच त्यांना काय हवे नको, याची काळजी घेण्याच्या सूचना सर्वच स्थानिक पोलीस स्टेशनला दिल्या आहेत. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांची नियमित विचारपूस करण्यासाठी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे नाते तयार झाले आहे. याच आपुलकीच्या नात्यांतून एका वयोवृद्ध आजीबाईंची आपल्या आईप्रमाणे काळजी घेऊन त्यांना जीवनदान देण्याचे काम राणे यांनी केले आहे. कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या प्रतिभा पालव (७०) या कोकणातील सिंधुदुर्ग या गावी गेल्या होत्या. त्यांना तेथून पुन्हा ठाण्यात यायचे असल्याकारणाने त्या तिकीट काढण्यासाठी सिंधुदुर्ग येथील तिकीट बुकिंग केंद्रावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राणे यांच्याशी संपर्क साधून कोपरी परिसरात कोरोनाची स्थिती जाणून घेऊन ठाण्यात येण्याबाबत विचारणा केली. याच दरम्यान त्यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्याने त्यांच्या मांडीचे हाड तुटले. त्यावेळी तेथील स्थानिक डॉक्टरांकडे गेले असता, रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. तसेच सहा महिने आरामदेखील करावा लागेल, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या नातेवाइकांना संपर्क न साधता थेट कोपरी पोलीस ठाण्याचे राणे यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. त्यावेळी राणे यांनीदेखील सतर्कता दाखवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर, राणे यांनी सिंधुदुर्ग येथील डॉक्टरांशी व त्यांच्या पुतण्याशी संपर्क साधून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे ठाण्यात आणण्यास सांगितले. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर, त्यांच्यावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. राणे यांनी केलेल्या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.