कल्याणमध्ये लग्न सोहळ्यात ७०० जण विनामास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:27+5:302021-03-13T05:13:27+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारपासून ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारपासून कडक निर्बंध लागू केले असताना कल्याण पूर्व भागात एका लग्न सोहळ्य़ात ७०० पेक्षा जास्त लोक विनामास्क सहभागी झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी लग्न सोहळ्याच्या आयोजकांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्व भागातील ६० फूट रस्त्यालगत गॅस कंपनीशेजारी एक मोठ्या स्वरूपाचा लग्नसोहळा सुरू आहे. त्यात ७०० पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्याची माहिती महापालिकेचे प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे यांना मिळताच प्रभाग अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांनी मास्क घातले नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळता वावरत असल्याचे दिसून आले. कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याबद्दल प्रभाग अधिकारी भोंगाडे यांच्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी लग्न सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे आणि महेश कृष्णा राऊत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बुधवारी कोरोनाचे नवे ३९२ रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने बुधवारपासून विविध प्रकारचे निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. त्याचवेळी लग्न सोहळ्य़ात ७०० पेक्षा जास्त लोकांना जमवून गर्दी करून कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याची घटना बुधवारी सायंकाळी प्रशासनास निदर्शनास आली. महापालिकेने जारी केलेल्या निर्बंधानुसार लग्न सभारंभात ५० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असू नये, असा नियम आहे. लग्न सोहळे आणि पार्ट्यांमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव महापालिका हद्दीत सुरू झाला, तेव्हा डोंबिवलीतील लग्न सोहळ्यात सहभागी झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तोच प्रकार पुन्हा दिसून आला आहे.
फोटो-कल्याण-लग्न सोहळा
----------------------
वाचली