ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले ७१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 04:53 AM2020-04-27T04:53:20+5:302020-04-27T04:53:28+5:30
नव्या ७१ रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७00 कडे सरकत आहे. कल्याण- डोंबिवलीत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
ठाणे : दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन संपण्यासाठी आठ दिवस शिल्लक असतानाच, ठाणे जिल्ह्यात रविवारी नव्याने ७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये सर्वाधिक २0 रुग्ण हे नवी मुंबईत सापडले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. नव्या ७१ रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७00 कडे सरकत आहे. कल्याण- डोंबिवलीत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात जास्त ४६ रुग्ण १३ एप्रिल रोजी आढळून आले होते. त्यानंतर बरोबर १३ दिवसांनी सर्वाधिक ७१ रुग्ण अक्षय्य तृतीयेला सापडल्याने कोरोनाचे संकट आणखी भीषण झाले आहे. नवी मुंबईत रविवारी २0 रुग्ण आढळून आले असून त्यापाठोपाठ ठामपा आणि मीरा-भार्इंदर येथे प्रत्येकी १७, केडीएमसी- १२, भिवंडी-२, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आला आहे. उल्हासनगर येथे रविवारी एकही रु ग्ण सापडलेला नाही. वाढलेल्या रुग्णांमुळे ठामपातील एकूण रुग्णसंख्या २२६ झाली आहे. केडीएमसी-१२९, भिवंडी-११, अंबरनाथ- ५, उल्हासनगर-२, बदलापूर-१७, मीरा-भार्इंदर-१४६, नवी मुंबई-१३१, ठाणे ग्रामीण-१८ असे जिल्ह्यात एकूण ६८६ रुग्ण आजवर झाले आहेत.
>नवी मुंबईच्या रुग्णाचा ठाण्यात मृत्यू
नवी मुंबईतील ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू २२ एप्रिलला ठामपाच्या कळवा रुग्णालयात झाला. कोरोना अहवाल रविवारी आल्याने त्याच्या मृत्यूची नोंद रविवारी करण्यात आली. या रुग्णामुळे नवी मुंबईतील मृत रुग्णांची संख्या पाच झाली असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या २0 झाली आहे.
वागळे इस्टेट ३ मेपर्यंत सील
रविवारी रात्री १२ वाजण्यापासून ३ मेपर्यंत वागळे इस्टेट प्रभाग समितीतील किसननगर, भटवाडी, गणेशचौक, शिवटेकडी, रोडनंबर १६ आणि रोड नंबर २२ हा परिसर पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हा परिसर पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदच्या काळात फक्त औषधाची दुकाने चालू राहतील. या परिसरांमध्ये संचारबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करत असल्याचे दिसून आले होते. वागळे इस्टेट प्रभाग समितीत रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.