७१ गाळेधारक अजून पुनर्वसनापासून वंचित, जागेचा वाद चिघळण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:43 AM2017-10-27T03:43:38+5:302017-10-27T03:43:40+5:30
ठाणे : महापालिका आयुक्तांनी पाठीवर हात ठेवला आणि तत्काळ पुनर्वसनाची हमी दिली.
ठाणे : महापालिका आयुक्तांनी पाठीवर हात ठेवला आणि तत्काळ पुनर्वसनाची हमी दिली. त्यानुसार आम्ही कशाचीही तमा न करता आमचे गाळे तोडण्याची परवानगी दिली. परंतु, आता तब्बल दोन वर्षांचा काळ लोटत आला, तरी अद्यापही पोखरण रोड नं. १ मधील बाधित झालेल्या ७१ गाळेधारकांचे पुनर्वसन झाले नसल्याचीच बाब समोर आली आहे. या बाधितांचे पुनर्वसन रेप्टॉकस कंपनीच्या जागेवर करण्याचे निश्चित झाले होते. परंतु, आता येथे स्मशानभूमीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने हे गाळेधारक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी या सर्वच गाळेधारकांनी महापालिकेत धाव घेऊन पुनर्वसनासाठी पुन्हा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना साकडे घातले.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील काही वर्षांत शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले. या रुंदीकरण मोहिमेत त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नव्हता. विशेष म्हणजे तत्काळ पुनर्वसनाच्या हमीवर अनेकांनी आपली बांधकामे स्वत:हूनदेखील तोडल्याचे दिसून आले.
या कारवाईनंतर बाधितांचे पुनर्वसन केल्याचे दावे महापालिका प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहेत. असे असतानाच पोखरण-१ च्या रस्ता रुंदीकरण मोहिमेतील ७१ बाधित गाळेधारक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
मागील ४० ते ४५ वर्षांपासून पोरखण रस्ता क्र मांक-१ येथील शास्त्रीनगर भागात आमचे गाळे होते. पुनर्वसनाची हमी देऊन महापालिकेने गाळे तोडले. या कारवाईला सुमारे दोन वर्षे उलटत आली आहेत. परंतु, अद्यापही आमचे पुनर्वसन झालेले नाही, असे बाधित गाळाधारक मनोज वारडे यांनी सांगितले.
कारवाईच्या वेळेस आयुक्तांनी आम्हाला पुनर्वसनाचा शब्द दिला होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला पुनर्वसनासाठी त्यांच्याकडे खेटे घालावे लागत आहेत. आधी पाठीवर हात ठेवला होता; परंतु आता त्यांच्या भेटीसाठी तीनतीन तास ताटकळत थांबावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत सुमारे ७१ गाळेधारक असून या सर्वांचे फॅब्रिकेशन, हॉटेल तसेच अन्य छोटे व्यवसाय होते. या सर्वच गाळेधारकांकडे तीन ते चार कर्मचारी काम करत होते. मात्र, गाळ्यांअभावी व्यवसाय बंद झाल्याने आमच्यासह कर्मचाºयांवरही बेकारीची कुºहाड कोसळली असल्याची माहिती दत्तात्रेय पाटील यांनी दिली. यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील आला.
आजही आमचे पुनर्वसन न झाल्याने पोटाची खळगी भरायची कशी, असा सवाल आता उपस्थित झाल्याची माहिती अशोक जैन या गाळेधारकाने दिली.
दरम्यान, गुरुवारी या ७१ गाळेधारकांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन जी जागा निश्चित केली होती. त्याच जागेवर पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. परंतु, त्या जागेवर आता स्मशानभूमीचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने त्यांना देण्यात आली. त्यामुळे तुळशीधामच्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची तयारी त्यांनी दर्शवली; परंतु इतकी वर्षे पोखरण येथे व्यवसाय केल्यानंतर आता दूरवर पुनर्वसन कशासाठी, असा सवाल उपस्थित करून या गाळेधारकांचे पहिल्याच जागेवर पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. वर्तकनगर येथील पोखरण रस्ता क्र मांक-१ वरील रेप्टोकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर स्मशानभूमी उभारण्यास स्थानिकांचा विरोध होता. तो डावलून सत्ताधारी शिवसेनेने त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या आरक्षणाचा प्रस्ताव मतदानाच्या जोरावर नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्याविरोधात स्थानिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
स्थानिकांचा विरोध डावलून सत्ताधारी शिवसेनेने त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या आरक्षणाचा प्रस्ताव मतदानाच्या जोरावर नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. एकीकडे त्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
आता दुसरीकडे पोखरण रस्ता क्रमांक १ मधील बाधितांनीही रेप्टोकॉसच्या सुविधा भूखंडावर पुनर्वसनाची मागणी केली आहे. त्यामुळे आता या जागेच्या मुद्यावरून हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.