७१० इमारतींवर टांगती तलवार, पुन्हा ‘साईराज’ची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:13 AM2017-11-25T03:13:26+5:302017-11-25T03:13:47+5:30
ठाणे : किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिस-या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत एका वृद्धाला जीव गमवावा लागला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत.
अजित मांडके
ठाणे : किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिस-या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत एका वृद्धाला जीव गमवावा लागला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत. यामुळे किसनगर भागातील दाटीवाटीने वसलेल्या तब्बल ७१० इमारती या धोकादायकच्या यादीत असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीमधील हजारो रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन मागील कित्येक वर्ष वास्तव्य करीत आहेत.
विजय निवास इमारतीच्या बाबतीत विचार केल्यास या इमारतीच्या तिसºया मजल्यावरील घराचा स्लॅब हा दुसºया मजल्यावर पडला आणि यात एकाचा मृत्यू झाला. प्रथम दर्शनी ही इमारत राहण्यास योग्य वाटावी म्हणून अंतर्गत डागडुजी बरोबर ओव्हरलोड केल्याचे बोलले जात आहे. परंतु, आता या भागातील सर्व अनधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसे पाहिल्यास संपूर्ण किसनगर भाग हा अनधिकृत इमारतींचा भाग म्हणून ओळखला जातो. वागळे पट्टा हा पूर्वी औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे दुरवरून येथे कामाला चाकरमानी येत होते. त्यांचे वास्तव्यच या भागात करून देण्यासाठी एकामागून एक इमारतींचे जाळे येथे उभारण्यात आले. त्यातून १९९० -९१ च्या दशकात किसननगर आणि शांतीनगरचा उदय झाला. याच भागात दाटीवाटीने इमारती उभारल्या गेल्या. राजकीय मंडळींनी, काही छोट्या मोठ्या कंत्राटदारांनी एकेक इमारत अवघ्या एक ते दोन महिन्यात उभ्या केल्या. विशेष म्हणजे यासाठी चांगल्या सिमेंटऐवजी सागोळी नावाच्या सिमेंटचा वापर केल्याचेही बोलले जाते. या सिमेंटचा दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे आता या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पालिकेच्या काही अधिकाºयांनी, स्थानिक राजकीय मंडळींनी याच अनधिकृत इमारतींच्या माध्यमातून आपले चांगभले केले. त्याचे भोग रहिवाशांना भोगावे लागत आहेत.
वागळे भागातील किसननगर भागात असलेल्या आणि गटारावरच उभारण्यात आलेली साईराज ही इमारत ७ नोव्हेंबर १९९८ च्या दिवशी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत १६ जणांना जीव गमवावा लागला, तर १४ जण जखमी झाले. ही घटना घडल्यानंतरही या भागात अनधिकृत इमारतींचे जाळे मात्र कमी झाले नाही. आजही येथे १५०० हून अधिक अनधिकृत इमारतींचे जाळे आहे. यापूर्वी एक हजाराहून अधिक इमारती धोकादायकच्या यादीत होत्या. आता त्यांची संख्या ७१० च्या घरात आहे. पालिकेकडून कारवाईची नोटीस आली की तात्पुरती डागडुजी आणि रंगरंगोटी करून इमारत राहण्यास योग्य असल्याचे भासवले जाते. परंतु, रहिवाशांच्या लक्षात येत नाही की, आपण साक्षात मृत्यू अंगावर घेऊन झोपत आहोत. पालिकादेखील याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे. एवढ्या दाटीवाटीने या इमारती उभारण्यात आल्या आहेत की, भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर साधी अॅम्ब्युलन्स किंवा अग्निशमन विभागाची गाडीदेखील जाणे दुरापास्त होणार आहे.
।दाटीवाटीने वसल्या आहेत इमारती
किसननगरमध्ये पायाखाली पाण्याच्या लाईनचे जाळे आहे. ठिकठिकाणी खड्डे खणण्यात येत आहेत. त्यामुळे आधीच या इमारतींचा पाया हा कच्चा असल्याने पुन्हा अशा प्रकारे खड्डे खोदले जात असल्याने त्याचा त्रासदेखील या इमारतींना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवा, पाणी, किंवा साधे सूर्याचे दर्शनदेखील येथील रहिवाशांना मुख्य रस्त्यावर आल्याशिवाय होत नाही. इतक्या दाटीवाटीने या इमारती वसल्या आहेत. बहुसंख्य इमारती ३० ते ३५ वर्षे जुन्या असल्याने त्यांची अवस्था दयनीय आहे. अनेक इमारती जीर्ण आहेत. असे असतांनाही सामान्य माणूस तेथे जीव धोक्यात घालून राहत आहे. इमारत रिकामी केली तर बेघर होण्याची भिती असल्याने रहिवासी घर सोडत नाहीत. पालिकेकडून दरवर्षी येथील इमारतींना नोटिसा बजावल्या जातात. त्यानंतर स्ट्रक्चरल आॅडिटही करण्याची घोषणा होते. परंतु, त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. क्लस्टरसाठी (समूहविकास) पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अद्यापही योजनेसाठी कालावधी जाणार आहे. पहिल्या टप्यात वागळे पटट््यातील किसनगर भागाचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत या भागाचा विकास करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यानुसार आता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात क्लस्टरचे काम केव्हा सुरू होणार हे पालिकेलादेखील सांगणे शक्य नाही.