जिल्ह्यात ८३ रुग्णालयांत ७,१३१ बेड रिक्त; कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:32 PM2021-02-24T23:32:45+5:302021-02-24T23:32:53+5:30
कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज : सुविधांचा घेतला आढावा
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ठाणे जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात असलेले कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह जिल्हा कोविड रुग्णालय अशा ८३ रुग्णालयांमध्ये आठ हजार ७८४ खाटांची संख्या असून सात हजार १३१ खाटांची उपलब्धता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज असून भविष्यातील रुग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केला. सुरुवातीला तुरळक प्रमाणात असलेल्या या आजाराने मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हाहाकार उडविला होता. सध्या जिल्ह्यातील सहा महानगरपालिका व ठाणे ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या दोन लाख ६१ हजार ६६७ इतकी झाली असून त्यापैकी दोन लाख ५० हजार ७४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत सहा हजार २४६ जणांना जीव गमवावे लागले आहे.
कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीला या आजाराने घातलेले थैमान यामुळे अनेकदा कोरोना बाधितांना बेड उपलब्ध न झाल्यामुळे व त्यांच्यावर उपचार न झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागल्याची ओरड होत होती. त्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील असलेली खाटांची क्षमता रुग्णांच्या तुलनेत अपुरी पडू लागली होती. याची गांभीर्याने दाखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आली होती.
तसेच जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांतर्गत पालिका आयुक्तांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबरोबरच अनेक खासगी रुग्णालयांचे कोविड रुग्णालयात रुपांतर केले होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने व रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने अनेक रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात रुपांतर केले होते. असे असताना आता, मागील १५ दिवसांपासून कोरोनाने आपले डोके पुन्हा वर काढले आहे. यामुळे यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासून कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील क्षेत्रातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि जिल्हा कोविड रुग्णालय यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.