ठाण्यात बेकायदा ७२ रिक्षा जप्त
By admin | Published: June 10, 2017 01:07 AM2017-06-10T01:07:27+5:302017-06-10T01:07:27+5:30
चालत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चालत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने रस्त्यावर बेकायदा धावणाऱ्या ७२ रिक्षांवर शुक्रवारी जप्तीची कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले.
ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, एन.सी. नाईक, निरीक्षक श्याम कमोद, श्रीकांत महाजन, दिलीप जऱ्हाडे, डॉ. विजय शेळके आदींच्या चार पथकांनी सायंकाळी ६.३० ते ९.३० वा. या कालावधीत तीनहात नाका आणि बाळकुमनाका येथे अचानक रिक्षांची तपासणी केली. धक्कादायक बाब म्हणजे अनेक रिक्षा १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले भन्नाट वेगाने चालवत होती. ३० रिक्षा चालकाशेजारी प्रवासी बसवून चालवण्यात येत होत्या.
अनेक चालकांकडे बॅज आणि लायसन्सही नव्हते. चालकांच्या अंगावर खाकी, तर रिक्षामालकांच्या अंगावर पांढरा शर्ट असणे आवश्यक असताना या नियमालाही हरताळ फासला होता.
भिवंडीतून बाळकुमकडे येणाऱ्या अनेक रिक्षाचालकांनी सर्वच नियमांचे उल्लंघन केले होते. परिणामी, अशा ७२ रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यात बाळकुम येथील २५, तर तीनहातनाका येथील ४० रिक्षांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती.