७४ रहिवाशांचा बळी : लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील जमीन मालकाची साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:08 AM2018-03-10T06:08:36+5:302018-03-10T06:08:36+5:30
७४ रहिवाशांचा बळी घेणा-या लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील मूळ जमीन मालकाची साक्ष ठाणे न्यायालयाने शुक्रवारी नोंंदवली. जमीन मालकाने यावेळी न्यायालयासमोर मुख्य आरोपींची ओळखही पटवली.
ठाणे - ७४ रहिवाशांचा बळी घेणा-या लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील मूळ जमीन मालकाची साक्ष ठाणे न्यायालयाने शुक्रवारी नोंंदवली. जमीन मालकाने यावेळी न्यायालयासमोर मुख्य आरोपींची ओळखही पटवली.
शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणी जमीन मालक रवींद्र धाकल्या वातास (४५) यांची साक्ष नोंदविण्यात आली. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे विकासक आरोपी जमील आणि सलीम यांनी वातास यांच्याकडून ६६ हजार चौरस फूट जमीन विकत घेतली होती. ही जमीन वातास आणि त्यांच्या भावाच्या नावावर होती. जमिनीचा सौदा पाच लाख रुपयांमध्ये ठरला होता. त्यासाठी २00९ ते ११ या कालावधीत साठे खत, अखत्यारपत्र, भाडे करारनामा आणि समझौता पत्र असे चार करारनामे करण्यात आले. या करारनाम्यांवर आरोपींच्या सह्या आणि अंगठे आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी हे करारनामे जप्त केले होते. या करारनाम्यांचे सीलबंद पाकिट शुक्रवारी न्यायालयासमोर उघडण्यात आले. विशेष सरकारी वकिल शिषिर हिरे यांनी वातास यांची साक्ष नोंदवली. आरोपींनी वातास यांच्याकडून जमीन विकत घेतल्यानंतर आधी तिथे पत्र्याचे गाळे बांधले. नंतर काही दिवसांनी ते काढून इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचे वातास यांनी न्यायालयासमोर सांगितले.
२०१३ मध्ये झाली दुर्घटनाग्रस्त
शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे विकासक आरोपी जमील आणि सलीम यांनी वातास यांच्याकडून ६६ हजार चौरस फूट जमीन विकत घेतली होती.
ही जमीन वातास आणि त्यांच्या भावाच्या नावावर होती. जमिनीचा सौदा पाच लाख रुपयांमध्ये ठरला होता. आरोपींनी वातास यांच्याकडून जमीन विकत घेतल्यानंतर आधी तेथे पत्र्याचे गाळे बांधले. काही दिवसांनी ते काढून इमारतीचे बांधकाम सुरू केले.