७४० कंपन्यांकडून नियमांचा भंग
By admin | Published: March 30, 2017 06:39 AM2017-03-30T06:39:59+5:302017-03-30T06:39:59+5:30
औद्योगिक परिसरातील ‘प्रोबेस’ कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनीमालकांकडून मार्जिन स्पेसमध्ये
मुरलीधर भवार / डोंबिवली
औद्योगिक परिसरातील ‘प्रोबेस’ कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनीमालकांकडून मार्जिन स्पेसमध्ये केल्या जाणाऱ्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. डोंबिवलीतील तब्बल ७४० कंपनीमालकांनी कंपनीच्या आवारातच अतिक्रमण केले असल्याची गंभीर बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
‘वनशक्ती पर्यावरण संस्थे’चे कार्यकर्ते अश्वीन अघोर यांनी एमआयडीसीकडे माहितीच्या अधिकारात अतिक्रमणाची माहिती मागितली होती. मार्जिन स्पेसमध्ये प्रक्रिया करणारे बॉयलर उभारले जातात. त्यामुळे कामगारांसह कंपनीच्या आसपास असलेल्या नागरी वस्तीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मे २०१६ मध्ये स्टार कॉलनीनजीक असलेल्या प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला. तेव्हा, हा स्फोट बॉयलरचा असल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर, त्याठिकाणी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामाची ठिणगी रसायनामध्ये पडली. त्यामुळे हा स्फोट झाला, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने माहितीच्या अधिकारात रहिवासी राजू नलावडे यांना दिली होती. प्रोबेस स्फोटाचे कारण शोधण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली असून ११ महिने उलटून गेले, तरी अद्याप समितीचा अहवाल तयार झालेला नाही.
कंपन्यांचे मालक सुरक्षिततेचे नियम पाळत नाहीत आणि त्यांनी नियम पाळावेत, याकरिता एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून प्रभावी कारवाई होत नाही.
मार्जिन स्पेसच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या कंपनीमालकांना गेल्या तीन वर्षांपासून नोटिसा बजावण्यात येत आहेत. एमआयडीसीने २००९ मध्ये विकास नियंत्रण नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन होत आहे. मात्र, तरीही कंपनीमालकांविरोधात एमआयडीसी ठोस कारवाई करीत नाही. प्रोबेस स्फोटानंतर प्रदूषण मंडळाने कंपनीच्या शेजारील सहा कंपन्या बंद केल्या होत्या. तसेच महापालिकेने केवळ चार बेकायदा इमारतींवर हातोडा चालवण्याचे काम केले होते. नियमांचे उल्लंघन करून उभारलेल्या बॉयलरमुळे एखादी मोठी स्फोटासारखी दुर्घटना घडू शकते. काही वर्षांपूर्वी विनायका टेक्सटाइल कंपनीला लागलेल्या आगीत चार कामगारांचा जळून मृत्यू झाला होता. कारण, त्याठिकाणी संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग चिंचोळा होता. ज्वलनशील पदार्थ कंपनीत ठेवू नये व त्याचा साठा तळघरात करू नये, असे नियम असताना त्याचेही उल्लंघन होते.
अतिक्रमण थांबेना
डोंबिवली एमआयडीसी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार फेज-१ व २ यामधील ७४० कंपनी मालकांकडून अतिक्रमण झाले आहे. जवळपास सगळ्याच कंपनीमालकांनी अतिक्रमण केल्याने अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांची यादी भलीमोठी आहे.