ठाणे जिल्ह्यातील ७५ अंगणवाड्यांची दुरुस्ती
By admin | Published: October 16, 2015 01:43 AM2015-10-16T01:43:30+5:302015-10-16T01:43:30+5:30
जिल्ह्यातील सहा वर्षे वयोगटातील मुले अंगणवाडी व मिनी अंगणवाड्यांमध्ये मोडकळीस आलेल्या वास्तूंत शिकत आहेत. मात्र, दुरवस्थेमुळे त्यांची दुरुस्ती किंवा नवीन वास्तू उभी करण्याकडे फारसे लक्ष देण्यात आले
सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्ह्यातील सहा वर्षे वयोगटातील मुले अंगणवाडी व मिनी अंगणवाड्यांमध्ये मोडकळीस आलेल्या वास्तूंत शिकत आहेत. मात्र, दुरवस्थेमुळे त्यांची दुरुस्ती किंवा नवीन वास्तू उभी करण्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. परंतु, राज्य शासनाने आॅगस्टमध्ये काढलेल्या जीआरमुळे ठाणे जिल्हा परिषदेने सुमारे ७५ अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे काम काढले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांशी अंगणवाड्या दीर्घकाळापासून नादुरुस्त असतानाही त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. याआधी जि.प.ला बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ही कामे करावी लागत असत. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. पण, आता महिला बालकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या जि.प.च्या बजेटच्या १० टक्के तरतुदीतून नवीन अध्यादेशानुसार कामे करावी लागणार आहेत. त्यानुसार, तत्काळ ७५ अंगणवाड्यांची कामे हाती घेऊन त्यावर सुमारे ८० लाख खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी या १० टक्के रकमेतून मुलांच्या अभ्यासक्रमासह बैठक व्यवस्था, साहित्य खरेदी, अंगणवाडी सेविकांचा प्रशिक्षण खर्च केला जात असे. परंतु, आता त्यातून दुरुस्तीची कामेही घेतल्यामुळे बालकांच्या सोयीसुविधा, साहित्य खरेदीत कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे ठेकेदारही आता त्याकडे लक्ष देऊन कामे करण्यासाठी सरसावले आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाव्दारे जिल्ह्यात सद्य:स्थितीला मिनी अंगणवाड्यांसह १८५४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे एक लाख ३९ हजार २४१ सहा वर्षे वयोगटापर्यंतची मुले शिक्षणाची तोंडओळख करीत आहेत. त्यासाठी सुमारे तीन हजार ७०८ सेविकांसह मदतनीस कार्यरत आहेत.