कुपोषणमुक्तीसाठी ७५ लाख
By admin | Published: October 7, 2016 05:40 AM2016-10-07T05:40:01+5:302016-10-07T05:40:01+5:30
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका व परिसरातील आदिवासी कुपोषित बालकांचा गंभीर प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर आणल्यावर रायगड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले
जयंत धुळप / अलिबाग
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका व परिसरातील आदिवासी कुपोषित बालकांचा गंभीर प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर आणल्यावर रायगड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्ह्यात तीव्र कुपोषित २४१ तर ९५८ कुपोषित बालके निष्पन्न झाली आहेत. जिल्ह्यातील आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून आदिवासी उपयोजनांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्र माच्या माध्यमातून २५ लाख
रुपयांचा तर आदिवासी उपयोजनेमधून ५० लाख रु पये असा एकूण ७५ लाख रुपयांचा निधी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या मान्यतेने तातडीने उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिली आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) आणि बाल उपचार केंद्र (सीटीसी) यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रु ग्णालय या ठिकाणी २१ दिवस सॅम (तीव्र कुपोषित) आणि मॅम (कुपोषित) बालकांना दाखल करण्यात येईल. त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील. जिल्हा परिषद यंत्रणा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत ही योजना राबविली जाणार आहे. यात व्हीसीडीसी अंतर्गत १२०० रु. प्रति बालक प्रति महिना तर सीटीसीअंतर्गत ५२५० रु.प्रति बालक प्रति महिना खर्च होणार आहे. जिल्ह्यात सध्या तीव्र कुपोषित(सॅम) २४१ तर कुपोषित(मॅम) ९५८ कुपोषित बालके आहेत. आदिवासी विकास योजनेअंतर्गत भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत २५ लाख रुपये तर अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थ्यांना अंडी व केळी वाटप यासाठी २५ लाख असा एकूण ५० लाख रु पयांचा निधी देण्यात आला.
ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना
च्ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थी गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल. एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. अंगणवाडी आणी मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दूध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला आदींचा समावेश राहाणार आहे.
५ हजार २१४ बालकांकरिता अमृत आहार : अमृत आहार योजना कर्जत तालुक्यात सुरु असून यात एकूण १३५ अंगणवाडी व मिनी अंगणवाडी आहेत. तर ४६० गरोदर महिला, ५१७ स्तनदा माता आणि ७ महिने ते ७ वर्षे या वयोगटातील ५ हजार २१४ बालके असून त्यांना या योजनेचा लाभ होत आहे. जिल्ह्यात कुपोषण दूर करण्यासाठी प्रशासन सतर्कतेने व गांभीर्यतेने पावले उचलत असून केलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसात निश्चितपणे दिसून येईल,असा विश्वास जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी अखेरीस व्यक्त केला आहे.