शंभर कोटींचे गाजर दाखवून बिल्डरला ७५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:12 AM2018-05-29T00:12:24+5:302018-05-29T00:12:24+5:30
१०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत उच्चशिक्षित त्रिकुटाने भिवंडीतील बिल्डरला ७५ लाख २० हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे
कल्याण : १०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत उच्चशिक्षित त्रिकुटाने भिवंडीतील बिल्डरला ७५ लाख २० हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या बिल्डरच्या फिर्यादीवरुन खडकपाडा पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला न्यायालयाने २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भिवंडीच्या अंजूरदिवा येथे राहणारे अविनाश पाटील (३४) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. व्यवसायानिमित्ताने त्यांची ओळख घन:श्याम शर्मा (रा. गोदरेजपार्क) तसेच सुब्रमण्यम आणि मनिला उर्फ मानसी यांच्याशी झाली. तेव्हा सुब्रमण्यमने फायनान्शिअल सर्व्हिसमध्ये पीएचडी केल्याचे पाटील यांना सांगितले.
नंतरच्या गप्पांमध्ये पाटील यांना १०० कोटीच्या कर्जाची गरज असल्याचे या त्रिकूटाला समजले. त्यांनी पाटील यांना कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी शर्माने पाटील यांना इंडोनेशियात नेऊन तेथील एका हॉटेलमध्ये सुब्रमण्यमसोबत भेट घालून दिली होती. यावेळी मनिला उर्फ मानसी ही सुद्धा शर्मासोबत असायची. कर्जाच्या फाईलची मंजुरी, कर्जमंजुरीच्या कामासाठी तसेच बांधकामाचा अहवाल या निमित्ताने पाटील यांच्याकडून या त्रिकुटाने डिसेंबर २०१४ ते डिसेंबर २०१७ या काळात ७५ लाख २० हजार रुपये उकळले.