गोवर बाधीत ७५ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेच नाही
By अजित मांडके | Published: December 2, 2022 05:14 PM2022-12-02T17:14:39+5:302022-12-02T17:15:01+5:30
मुंब्रा, शिळ, कौसा, आतकोनेश्वर नगर आदी भागात गोवर रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही दिसून आले आहे.
ठाणे :
ठाणे महापालिका हद्दीत गोवरने आणखी एक मृत्यु झाला आहे. ठाण्यात गोवर बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून आतार्पयत ८१ जणांना याची लागण झाली असून त्यातील ७५ टक्के रुग्णांचे लसीकरणच झाले नसल्याची गंभीर बाब ठाणो महापालिकेने केलेल्या सव्र्हेक्षणात आढळून आले आहे. तर मुंब्रा, शिळ, कौसा, आतकोनेश्वर नगर आदी भागात गोवर रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही दिसून आले आहे. त्या खालोखाल उथळसर आणि इतर भागात २ ते ३ रुग्ण आढळून आले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून गोवर बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यात गुरुवारी आणखी एका दिड वर्षाच्या बाळाचा गोवरमुळे मृत्यु झाल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे गोवर बाधीत रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानुसार कळवा आणि पार्कीग प्लाझा येथे रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जात आहे. परंतु आतार्पयत आढळलेल्या एकूण ८१ रुग्णांपैकी २ जणांचा मृत्यु झाला असून यातील ७५ टक्के रुग्णांचे गोवर लसीकरण झाले नसल्याची गंभीर बाब निर्दशनास आली आहे.
ठाणे महापालिकेने घरोघरी जाऊन सुरु केलेल्या सर्वेक्षणात गोवर संशयित रुग्णांचा शोध घेण्याबरोबरच गोवर रुबेला लस घेतलेली नाही अशा मुलांचाही शोध घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी १६० पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी १४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत २ लाख ७६ हजार २२४ घरांपैकी २ लाख २३ हजार ४१८ घरांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. त्यात ताप आणि गोवरची लक्षणे असलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३२८ गोवर संशियत रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३२५ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३०३ जणांचे तपासणी अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यात ८१ जण गोवरबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यातील ६६ ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत तर, १५ जण महापालिका क्षेत्राबाहेरील आहेत. मुंब्रा, कौसा, एमएम व्हॅली, शीळ आणि आतकोनेश्वरनगर या भागात गोवरचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर, त्या तुलनेत उथळसर आणि शहराच्या इतर भागात दोन ते रुग्ण आढळून येत आहेत. घरोघरी सर्वेक्षणादरम्यान ८ हजार ६८७ मुलांनी गोवर रुबेला लस घेतलेली नसल्याचे आढळून आले असून त्यांचे विशेष लसीकरण शिबीरांमध्ये लसीकरण करण्यात आले आहे. त्यातील १७१७ मुलांना गोवर रुबेलाची पहीली मात्रा, २०८२ मुलांना दुसरी मात्रा आणि ४८८८ मुलांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.