७५ टक्के रिक्षा सीएनजीवर, तरी भाडे पेट्रोलचेच!
By admin | Published: January 19, 2016 02:07 AM2016-01-19T02:07:34+5:302016-01-19T02:07:34+5:30
एकीकडे परिवहन सेवेचे दर आटोक्यात येत नसल्याने सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा तरी स्वस्त होतील, अशा आशेवर असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना
कल्याण : एकीकडे परिवहन सेवेचे दर आटोक्यात येत नसल्याने सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा तरी स्वस्त होतील, अशा आशेवर असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना आरटीओचा भोंगळ कारभार आणि रिक्षा संघटनांच्या भूमिकेच्या वादाचा फटका बसला आहे. या वादात अजून वर्षभर तरी रिक्षांचे भाडे कमी होण्याची चिन्हे नाहीत. पंपांच्या कमतरतेमुळे या परिसरातील रिक्षा १०० टक्के सीएनजीवर चालण्यास अजून वर्ष लागण्याची चिन्हे आहेत.
७५ टक्के रिक्षा सीएनजीवर चालत असल्या तरी त्यांचे नवे दरपत्रक लागू होऊ शकते, असे सांगणारे आरटीओचे अधिकारी तेवढे प्रमाण गाठूनही मूग गिळून गप्प आहेत, तर जोवर १०० टक्के रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होत नाहीत, तोवर म्हणजे अजून वर्षभर नवे दरपत्रक लागू होऊ शकत नाही, अशी संघटनांची भूमिका आहे. त्यामुळे तूर्त तरी प्रवाशांना पेट्रोलच्या वाढीव दरपत्रकानुसारच प्रवास करावा लागणार आहे.
रुपया-दोन रुपयांची बेकायदा भाडेवाढ होत असूनही अणि शेअर रिक्षांच्या भाड्यात मनमानी दरवाढ होऊनही आरटीओने आजवर कधीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षे पेट्रोलचे दर वाढताच भाडेवाढ होते, पण गेल्या वर्षभरात सातत्याने दर कमी होऊनही भाड्यात कपात झालेली नाही. कल्याण आरटीओ कार्यालयांतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा, विठ्ठलवाडी, मुरबाड हा भाग येतो. या परिसरात सध्या जवळपास २२ हजार रिक्षा चालतात. कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सक्षम नसल्याने ती सगळीकडे पूर्णपणे पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे रिक्षा प्रवासाला सक्षम पर्याय देण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. रिक्षा १०० टक्के सीएनजीवर चालवाव्या, अशी मागणी ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या कोकण विभागाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केली आहे. आधीपासूनच ते ही मागणी करीत आहेत.
एकूण रिक्षांपैकी ७५ टक्के रिक्षा सीएनजीवर चालतात. आता अवघ्या २५ टक्के रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होणे शिल्लक आहे. हे काम कधी पूर्ण होईल, याबाबतची वेळ-काळ सांगता येणार नाही, असे कल्याण आरटीओ कार्यालयाचे सरकारी उत्तर आहे. रिक्षाचालकांवर सीएनजीची सक्ती करता येत नाही. सीएनजी इंधनाचे पंप कल्याण-डोंबिवलीत कमी प्रमाणात आहेत, असे कारण त्यांनी त्यासाठी दिले आहे. सध्या भिवंडी मार्गावर रांजनोली येथे सीएनजी पंप आहे. दुसरा पंप शीळफाटा मार्गावर आहे. तिसरा पंप अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यावर आहे. कल्याण पश्चिमेला जोकर टॉकीजजवळ एक पंप आहे. रिक्षांची संख्या पाहता आणखी चार सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त रिक्षा सीएनजीवर परावर्तीत झाल्यावर सीएनजीचे दरपत्रक जाहीर करता येते. सध्या अजून काही रिक्षा शिल्लक आहेत. ते प्रमाण पूर्ण झाले की, लगेचच सीएनजीचे दरपत्रक लागू होईल. पण, ते कधी होईल, हे सांगता येत नाही, असे आरटीओचे म्हणणे आहे.
कल्याण-डोंबिवलीत आणखी चार सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. कल्याण शहरात एकच पंप आहे. डोंबिवली पश्चिमेला, मानपाडा रोडवर, कल्याण पूर्वेला आणि कल्याण पश्चिमेतील शहाड पूल परिसरात सीएनजी पंपांची आवश्यकता आहे. अद्याप हे पंप उभारण्यात आलेले नाहीत, असा तपशील महासंघाचे अध्यक्ष पेणकर यांनी पुरविला. सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांची संख्या सध्या ६० टक्के आहे, असा दावा त्यांनी केला. उर्वरित ४० टक्के रिक्षा सीएनजीवर येणे गरजेचे आहे. १०० टक्के रिक्षा सीएनजीवर येण्यास किमान वर्षाचा कालावधी जाईल. जोवर सर्व रिक्षा सीएनजीवर परावर्तीत होत नाहीत, तोवर त्यांचे वेगळे भाडे दर आरटीओकडून निश्चित केले जात नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
सीएनजी रिक्षांच्या प्रमाणाबाबत आरटीओ आणि संघटनांत मतभेद आहेत. सीएनजी रिक्षाचालकांना पंपांवर स्वस्त दरात गॅस मिळतो, तरीही नियमानुसार ते प्रवाशांकडून पेट्रोलचेच भाडे वसूल करतात.