मीरा-भार्इंदरमधील ७८ बार बंद
By admin | Published: May 4, 2017 05:47 AM2017-05-04T05:47:44+5:302017-05-04T05:47:44+5:30
मीरा-भार्इंदरमध्ये २००६ पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये २००६ पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग झाल्यानंतरही त्याची पुर्नअधिसूचना विभागाने न काढल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने या रस्त्यावरील ७८ बार मंगळवारपासून बंद केले. त्यात काही वाईन व बिअर शॉपचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हा फटका बसल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले.
पश्चिम महामार्गावरील अनेक बार सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे बंद झाले आहेत. २००६ पूर्वी काशिमिरा ते उत्तन दरम्यान असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ सार्वजनिक विभागाने पालिकेकडे हस्तांतरीत केला. त्यामुळे काशिमीरा ते पूर्वीचे रेल्वे फाटक दरम्यानचा रस्ता तसेच रेल्वे फाटक ते भार्इंदर पोलिस ठाणेमार्गे उत्तन दरम्यानच्या रस्त्याची देखभाल दुरूस्ती पालिकेकडूनच केली जाते. त्यामुळे सध्या हा महामार्ग नसून तो शहरातंर्गत वाहतुकीचा रस्ता २००६ पासून अस्तित्वात आला आहे. परंतु, बांधकाम विभागाकडून पालिकेकडे हस्तांतरीत झाल्याची पुर्नअधिसूचना विभागाने न काढल्यामुळे हा रस्ता उत्पादन शुल्क विभागाच्या दप्तरी राज्य महामार्ग म्हणूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे हा रस्ता महामार्गाशी संबंधित नसला तरी उत्पादन शुल्क विभागाने या मार्गावर सुरु असलेले ७८ बार, बिअर व वाईन शॉप मंगळवारपासून बंद केले आहेत.
बार अचानक बंद केल्याने बारमालकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे धाव घेतली. विभागाने त्यांना तो रस्ता पालिकेच्या अखत्यारित असल्याचे पत्र आणण्यास सांगितले. पत्र आणूनही त्यावर विभागाचे समाधान न झाल्याने त्यांनी बांधकाम विभागाकडून पत्र आणण्याचे निर्देश दिले. ते पत्र बारमालकांनी आणल्यानंतर विभागाने अधिसूचनेची मागणी केली. मात्र बांधकाम विभागाकडे पुर्नअधिसूचनेची नोंदच नसल्याने बारमालकांची कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)
नूतनीकरणाचे
शुल्क वसूल
च्पत्रांनुसार उत्पादन शुल्क विभागाने त्या बारचे पुढील वर्षाचे आगाऊ नूतनीकरण शुल्कही वसूल केले आहे. त्यात परमीट रूमसाठी ४ लाख, वाईन शॉपसाठी ६ लाख व बिअर शॉपसाठी १ लाख २० हजार रुपये मालकांनी एक्साईज विभागाकडे जमा केले आहेत.
च्नूतनीकरणाची रक्कम वसूल करूनही बार बंद केल्याने मालकांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली आहे.
बारमालकांचे
होतेय नुकसान
च्राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरपर्यंतच्या पट्यातील बार बंद करण्याचे आदेश दिल्याने बारमालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पालिका व बांधकाम विभागाच्या दप्तरी तो रस्ता महामार्ग नसल्याची नोंद असतानाही केवळ अधिसूचना नसल्याचे कारण देत एक्साईज विभागाने केलेली कारवाई अयोग्य आहे. आम्ही न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. - मधुकर शेट्टी, अध्यक्ष, बार आयहेल्प सेल.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३५० हून अधिक बार बंद केले आहेत. महामार्गाच्या नोंदीप्रमाणे ५०० मीटर परिसरातील बार बंद करणे अपेक्षित असतानाही तसे न करता केवळ गृहीत धरलेल्या महामार्गावरीलच बार बंद केले आहेत. हे अयोग्य आहे.
- अरविंद शेट्टी, पदाधिकारी, मीरा-भार्इंदर हॉटेल असोसिएशन.