पुढील पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार; एकनाथ शिंदेंची घोषणा
By अजित मांडके | Updated: February 5, 2025 15:36 IST2025-02-05T15:35:54+5:302025-02-05T15:36:27+5:30
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली.

पुढील पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार; एकनाथ शिंदेंची घोषणा
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पुढील पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून ८ लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र ही घरे उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा असे सांगताना त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासू असे सूतोवाच ही त्यांनी यावेळी केले.
ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. यावेळी २१४७ सदनिका आणि ११७ भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी रेवती गायकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याला हक्काचं घर मिळाला पाहिजे आणि चांगलं घर मिळाला आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळाला पाहिजे त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे काम म्हाडा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही गेले अडीच वर्षापासून काम करत आहोत, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत, काही अडथळे होते स्पीड ब्रेकर होते, ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचेही ते म्हणाले.
म्हाडाची विश्वासार्हता वाढलेली आहे, तसेच गुणवत्ता सुधारली आहे, परंतु हे करीत असताना लोकांना चांगली घरे दिली गेली पाहिजे, घरामध्ये गळती होता कामा नये, छान भिंती असल्या पाहिजे याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केली. माझ्याकडे आता नगरविकास आणि गृह निर्माण खाते आहे त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा, मात्र गुणवत्ता चांगली द्या असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गिरणी कामगार आणि डबे वाल्यानाही घर मिळणार
म्हाडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे, या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत. त्यामध्ये परवडणारी घरे, भाड्याची घर, ज्येष्ठांसाठी घर, वर्किंग वुमन काम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी घरे ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल का नाही या आशेवर होता मात्र आता त्याला सुध्दा घर दिले जाणार आहे. तसेच डबे वाल्याना सुद्धा घर दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टुडन्ट हॉस्टेल देखील उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुणवत्ता तपासणार
लोकांचा विश्वास म्हाडावर आहे, त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकर द्या,चांगल्या दर्जाचे घर द्या, म्हाडाने गुणवत्ता आणि दर्जा वर लक्ष केंदित केले आहे. मात्र घरांची गुणवत्ता आम्ही तपासू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरवर्षी ३० हजार घरांची लॉटरी काढणार
म्हाडाने मागील दीड वर्षात ३ लॉटरी काढल्या आहेत, तसेच यापुढे ही म्हाडाच्या माध्यमातून अशाच पध्दतीने लॉटरी काढली जाणार आहे. याशिवाय दरवर्षी म्हाडाच्या माध्यमातून ३० हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.