पोलिसांच्या ताफ्यात ८९ वाहने
By admin | Published: May 24, 2017 01:06 AM2017-05-24T01:06:01+5:302017-05-24T01:06:01+5:30
ठाणे शहर पोलिसांकडील वाहनांच्या ताफ्यात चार कोटी ६५ लाखांच्या ८९ अत्याधुनिक वाहनांची भर पडली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या हस्ते या वाहनांना लवकरच हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे
जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलिसांकडील वाहनांच्या ताफ्यात चार कोटी ६५ लाखांच्या ८९ अत्याधुनिक वाहनांची भर पडली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या हस्ते या वाहनांना लवकरच हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३५ पोलीस
ठाण्यांच्या बिट मार्शलच्या दुचाकींची अवस्था गंभीर झाली होती. अनेक दुचाकींच्या नादुरुस्तीमुळे बिट मार्शलांंना खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता.
पोलीस नियंत्रण कक्षाच्या (पीसीआर) व्हॅनही ३५ पैकी २५ पोलीस ठाण्यांमध्येच उपलब्ध होत्या. केवळ एक पीसीआर व्हॅन उपलब्ध असल्यामुळे अरुंद रस्त्यावरुन गस्तीसाठी पोलिसांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्या दूर करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्य सरकारकडे गस्तीकरिता कारसह दुचाकींचीही मागणी केली होती. शासनाने ही मागणी मान्य करुन एक कोटी ६८ लाखांच्या १४ लाईट व्हॅन, सुमारे दोन कोटी ८० लाखांच्या कार आणि १७ लाख ५० हजारांच्या ३५ मोटारसायकल अशी वाहने ठाणे पोलिसांना दिली आहेत.
असा होणार उपयोग
ठाणे आयुक्तालयातील ३५ पैकी वर्तकनगर, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी २५ पोलीस ठाण्यांमध्ये पीसीआर मोबाईल आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासाठी पीटर १ तर पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्यासाठी पीटर २ अशी वाहने उपलब्ध आहेत. नव्या वाहनांमधील ज्याठिकाणी पीसीआर मोबाईल नाही, त्याठिकाणी लाईट व्हॅन दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त सर्वच ३५ पोलीस ठाण्यांना तिसरी अतिरिक्त पीसीआर २ ही अत्याधुनिक कार दिली जाणार आहे.