80 दिन बाद... पहाटे 4.48 वाजता डोंबिवलीतून पहिली लोकल धावली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 09:04 AM2020-06-15T09:04:10+5:302020-06-15T11:16:20+5:30
राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर रविवारी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती
डोंबिवली: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून अखेर सुमारे 80 दिवसांनंतर लोकल सेवा सुरू झाली असून प्रवास करणाऱ्या कामगारांमध्ये काहीसे दडपण असल्याचे दिसून आले. पहाटे 4 वाजून 48 मिनिटांनी पहिली लोकलडोंबिवली स्थानकातून सुटली, त्यांच्यनंतर आतापर्यंत सुमारे 5 लोकल ठराविक अंतराने धावल्या, या सगळ्या लोकल जलद मार्गावर सुटल्या असून त्यामधून तुलनेने तुरळक कर्मचारी मुंबई मार्गावर गेले.
राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर रविवारी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, सोमवारी लोकल धावणार की नाही, याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून काहीच सांगण्यात आले नव्हते. मात्र, डोंबिवली स्टेशनहून आज पहाटे 4.48 वाजता पहिली लोकल रवाना झाली. केवळ, अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच लोकलमध्ये एंट्री देण्यात आली आहे.
डोंबिवलीतून पश्चिमेला कल्याण एन्ड तर पूर्वेला रामनगर एन्डच्या पुलाजवळ तिकीट खिडकीत तिकीट, पास सुविधा सुरू होती, तेथेच तापमान चेक केले जात होते, त्यानंतर मधल्या पुलावरून फलाट 3 व चारवर जाण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. कोपर उड्डाणपूल तोडल्या कारणाने सामान्य नागरिकांना पूर्व पश्चिम ये जा करण्यासाठी रामनगर मुंबई एन्डचा पादचारी पूल खुला करण्यात आला होता, तर ज्यांना रेल्वे प्रवास करायचा आहे त्यांना मधल्या पुलावरून प्रवासाची मुभा देण्यात आली होती. असेच नियोजन पुढील काही दिवस सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.