गर्डर बसविण्याचे ८० टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:39 AM2021-03-25T04:39:31+5:302021-03-25T04:39:31+5:30
मुंब्रा : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलासाठी मुंब्य्राजवळील रेतीबंदर परिसरातील रस्त्यावर सुरू असलेले ...
मुंब्रा : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलासाठी मुंब्य्राजवळील रेतीबंदर परिसरातील रस्त्यावर सुरू असलेले गर्डर बसविण्याचे ८० टक्के काम बुधवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. यामुळे सलग चौथ्या दिवशी ठाणेकरांना वाहतूककोंडीला ताेंड द्यावे लागले.
शनिवारी रात्रीपासून हे काम सुरू आहे. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे कामाला कमालीचा विलंब होत आहे. पुलासाठी ८० मीटर लांबीच्या गर्डर बसविण्यात येणार आहे. पैकी ६५ मीटर लांबीचा गर्डर बुधवारी संध्याकाळपर्यंत बसवण्यात आला होता. १५ मीटर लांबीचा गर्डर बसविण्याचे काम अपूर्ण असल्यामुळे येथील रस्त्यावरून तसेच मुंब्रा बायपासमार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू केली नसून ठाणे, भिंवडी, गुजरात, घोडबंदर आदी दिशेला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक सलग चौथ्या दिवशीही पर्यायी मार्गाने वळविली होती, अशी माहिती मुंब्रा (उपविभाग) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी लोकमतला दिली.