८० लाखांचा होणार अक्षरश: चुराडा

By admin | Published: April 26, 2017 11:54 PM2017-04-26T23:54:45+5:302017-04-26T23:54:45+5:30

अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी पालिकेने

80 lakhs will definitely be chaired | ८० लाखांचा होणार अक्षरश: चुराडा

८० लाखांचा होणार अक्षरश: चुराडा

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी पालिकेने ८० लाखांच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत. मात्र, या सर्व निविदा २१ टक्के कमी दराने असल्याने शाळांची दुरुस्ती ही केवळ नावापुरतीच होणार आहे. कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या हितसंबंधातून ८० लाखांचा चुराडा होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळांची दुरुस्ती आणि या शाळांच्या संरक्षण भिंतीचा विषय हा चिंतेचा होता. या शाळांची दुरुस्ती होतच नाही, असा आरोप प्रत्येकवेळी करण्यात आला. शाळांची स्थिती सुधारावी, या हेतूने अंबरनाथ नगरपालिकेने ८० लाखांची तरतूद करून आवश्यक असलेल्या सर्व शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली. त्यात शाळा क्रमांक-८ कानसई शाळेची संरक्षक भिंत बांधण्यासाठी ८ लाख ९० हजार, कैलासनगर शाळा क्रमांक १/१३चे संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५ लाख ९६ हजार, त्याच शाळेच्या वर्गखोलीची दुरुस्तीसाठी ९ लाख ९४ हजार, अंबरनाथ गाव येथील शाळा क्रमांक १० येथे कुंपण भिंत बांधण्यासाठी ९ लाख ९१ हजार, शाळा क्रमांक ९ शिवमंदिर येथील शाळेतील वर्गांच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ९६ हजार, शाळा क्रमांक ६ व १६ मोरिवली नवीन शाळेच्या वर्गखोली दुरुस्तीसाठी ७ लाख ९४ हजार, वडोळगाव येथील शाळा क्रमांक १२ मधील वर्गाच्या दुरुस्तीसाठी ९ लाख ९२ हजार, बहुभाषिक शाळेसमोरील बाजूस पूर्व संरक्षण भिंत बांधण्यासाठी ९ लाख ८९ हजार, वडोळगाव शाळेची भिंत बांधण्यासाठी ४ लाख ९६ हजार, शाळा क्रमांक ७ व १७ वडवली वेल्फेअर सेंटरजवळील संरक्षण भिंत बांधण्याकरिता ६ लाख ९४ हजार आणि शाळा क्रमांक ७ व १७ मध्ये वर्गखोलीच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ९६ हजारांची तरतूद केली आहे. या कामांच्या निविदाही प्रसिद्ध केल्या.
या निविदांमध्ये बहुभाषिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम वगळता सर्व कामे मूळ किमतीच्या २१ टक्के कमी दराने भरण्यात आली आहेत. त्यामुळे कमी किमतीत शाळांची दुरुस्ती कंत्राटदार किती जबाबदारीने करणार, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच शाळांची अवस्था बिकट आहे. त्यात २१टक्के कमी किमतीत निविदा गेल्याने कंत्राटदार शाळेचे काम निकृष्ट करण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ पालिकेत याआधीही स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची कामे १६ टक्के कमी दराने भरली होती. मात्र, त्यातील बहुसंख्य कामे निकृष्ट होती. कंत्राटदाराने स्वच्छतागृहाची रंगरंगोटी करून थेट बिल काढण्याचे कामदेखील केले. अधिकारी हे कंत्राटदाराला झुकते माप देत असल्याने ते करतील ते काम योग्य, अशी परिस्थिती आहे. चुकीचे काम कंत्राटदाराने केले तरी त्याला संरक्षण देणारे हे अधिकारीच आहेत. त्यामुळे अधिकारी आपल्याच सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास कसा आवळणार, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
मीरा रोड : मनमानी शुल्कआकारणी करणाऱ्या भार्इंदरच्या नारायणा ई-टेक्नो शाळेविरोधात बुधवारी सकाळपासून पालकांनी धरणे आंदोलन केले. भार्इंदर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. शाळेला मंजुरीच नसून मनमानी व बेकायदा शुल्क आकारून शाळा व्यवस्थापन लूटमार करत असल्याचा आरोप पालकांनी केला. आंदोलनानंतर शाळेने विद्यार्थ्यांकडून आकारलेले प्रवेश शुल्क मागे घेत असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पालिका शिक्षण विभागाकडून कारवाई होत नसल्याने पालक नाराज आहेत. भार्इंदर पश्चिमेस नारायणा ई-टेक्नो शाळा सुरू करताना अन्य शाळांतील व नवीन विद्यार्थ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी शाळेने दोन वर्षांत शुल्कवाढ करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात शाळेने १० ते १५ हजारांची फीवाढ केली. इतकेच नव्हे, तर सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनसुद्धा प्रवेश शुल्क म्हणून मिळेल तसे पैसे उकळले.
पुस्तकांची किंमत कमी असताना तिप्पट पैसे घेतले जात होते. एकूण घेतल्या जाणाऱ्या शुल्काबाबतचे स्पष्टीकरण पालकांनी मागितले असता ते देखील दिले जात नव्हते. गणवेशासाठी सक्ती करून अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात, असा आरोप पालकांनी केला. पूर्व प्राथमिक विभागासाठीही तब्बल १० हजार, क्रीडासाठी ५ हजार ४००, लायब्ररी १५ हजार अन्य अ‍ॅक्टिव्हिटी शुल्क म्हणून आकारले जात असल्याचे एका पालकाने सांगितले. शाळेला अजूनही सीबीएससी बोर्डासह सरकारची परवानगी मिळालेली नाही.
शाळेचे स्वत:चे मैदान नसल्याने परवानगी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आंदोलनाची माहिती मिळताच भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे घटनास्थळी दाखल झाले. नगरसेवक सुरेश खंडेलवालही आले. पालकांचे आरोप व मागण्या पाहता शाळा व्यवस्थापन व पालकांची बैठक पोलीस, खंडेलवाल यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी व्यवस्थापनाने प्रवेश शुल्क परत करण्याचे आश्वासन दिले. आता जुन्या विद्यार्थ्यांना कमी, तर नवीन विद्यार्थ्यांना जास्त शुल्क म्हणजेच एकाच वर्गातील विद्यार्थ्यांचे शुल्क वेगवेगळे असणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 80 lakhs will definitely be chaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.