८० टक्के शाळांना हेडमास्तरच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:27 AM2018-06-19T03:27:19+5:302018-06-19T03:27:19+5:30
एकीकडे २०१८-१९ च्या शिक्षण विभागाच्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे.
ठाणे : एकीकडे २०१८-१९ च्या शिक्षण विभागाच्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे. अत्याधुनिक शिक्षणपद्धती अंगीकारण्यासाठीदेखील पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, असे असतानाही तब्बल ८० टक्के शाळांना सलग तिसऱ्या वर्षी मुख्याध्यापक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी डिजिटलचे धडे देणे, ई-लर्निंग आदींसह इतर योजना शिक्षण विभागाने हाती घेतल्या आहेत. परंतु, आता तर यंदाचे शैक्षणिक वर्षदेखील सुरू झाले आहे. असे असतानादेखील अद्यापही महापालिका शाळांना मुख्याध्यापक देता आलेले नाहीत.
यासंदर्भात काही शिक्षक संघटनांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यानंतर सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन काही शाळांमध्ये जुन्या शिक्षकांना मुख्याध्यापकपदाची सूत्रे दिली होती. परंतु, त्यांना जबाबदाºया मात्र दिल्या नव्हत्या. अनेक शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळेही अनेक शिक्षक जे मुख्याध्यापकांची जबाबदारी सहज पेलू शकतात, तेदेखील यापासून वंचित राहण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या ८१ शाळा इमारती असून त्यामध्ये १२१ शाळा चालवल्या जातात. यामध्ये सुमारे ३६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकवण्याचे काम १२०० शिक्षक करत आहेत. परंतु, मराठी माध्यमाच्या २९, उर्दू माध्यमाच्या १९ आणि हिंदी माध्यमाच्या ४ अशा एकूण ५२ शाळांना मुख्याध्यापक अद्यापही उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.
>आता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्याने हा विषय प्रलंबित राहिलेला आहे. परंतु, आचारसंहिता संपल्यानंतर लागलीच हा विषय मार्गी लावला जाणार आहे.
- विकास रेपाळे, शिक्षण मंडळ अध्यक्ष