एसटीच्या ८० टक्के बसगाड्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:12+5:302021-08-20T04:46:12+5:30
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका एसटी विभागाला अधिक प्रमाणात बसला आहे. आता अनलॉक झाल्यानंतर एसटीच्या ...
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका एसटी विभागाला अधिक प्रमाणात बसला आहे. आता अनलॉक झाल्यानंतर एसटीच्या बसगाड्या रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वेसेवादेखील सुरू झाल्याने एसटीवरील ताण कमी झाला आहे. ग्रामीण भागातील शाळा अद्यापही सुरू न झाल्याने एसटीचे काम म्हणावे तसे अद्यापही सुरू झालेले नाही. सध्या एसटीचे ८० टक्के काम सुरू झाले आहे. परंतु, शाळा सुरू झाल्यानंतर एसटीचे ९२ टक्के ऑपरेशन पुन्हा सुरू होईल, असा विश्वास एसटी विभागाने व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपूर्वी ठाणे विभागाचे ऑपरेशन नियमितपणे ९२ टक्के इतके होत होते. लॉकडाऊन झाल्यावर एसटीच्या ऑपरेशनला धक्का लागला. गतवर्षी गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दरवर्षीप्रमाणे नियोजन झाले नव्हते. अगदी शेवटच्या क्षणी काही प्रमाणात गाड्या सोडल्या गेल्या. पण त्यामध्येही काही अटी व शर्ती असल्याने पाहिजे तसा प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाले आणि एसटीचा कारभार कसाबसा सुरळीत होण्यास सुरू होणार, तोच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि ती एसटीला मारक ठरली. मालवाहतूक तसेच बेस्टच्या जोडीने मुंबईकरांना सेवा दिल्याने कसाबसा एसटीचा कारभार सुरू असताना, आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा गणेशोत्सवाला ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील जवळपास सर्वच बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दुसरीकडे लोकल सेवा ही सर्वांसाठी म्हणजे दोन डोस घेणाऱ्यांसाठी सुरू झाल्याने आता कुठे ऑपरेशन सुरळीत सुरू होताना दिसत आहे. त्यामुळे ठाणे विभागाची ऑपरेशनची सरासरी ८० टक्क्यांवर कशीबशी पोहोचली आहे. कोरोनापूर्वी ठाणे विभागाचे उत्पन्न दररोजचे ५२ लाखांच्या आसपास होते. ते कोरोना काळात पार घसरले होते. हे उत्पन्न मागील ४० दिवसांत ४२ लाखांच्या आसपास गेलेले आहे. याच दिवसांत १० हजार किलोमीटरची भर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.............
शाळा सुरू झाल्यावर कोरोनापूर्वी होती, त्या स्थितीत ठाणे विभाग येईल यात शंका नाही. सध्या विभागाचे ऑपरेशन ८० टक्क्यांचा आसपास सुरू झाले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन होऊ नये एवढीच इच्छा आहे.
विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक अधिकारी, ठाणे
.................