डोंबिवलीत गॅस सिलेंडर स्फोटात ८० वर्षिय महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 06:05 PM2018-07-20T18:05:59+5:302018-07-20T18:08:46+5:30
येथील एमआयडीसी परिसरातील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये राहणा-या शुभदा वासुदेव वडगबावकर (८०) या ज्येष्ठ नागरिक महिला गॅस सिलेंडर स्फोटात ६० टक्के भाजल्याची घटना शुक्रवारी दुपारी १वाजून १० मिनिटांनी घडली.
डोंबिवली: येथील एमआयडीसी परिसरातील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये राहणा-या शुभदा वासुदेव वडगबावकर (८०) या ज्येष्ठ नागरिक महिला गॅस सिलेंडर स्फोटात ६० टक्के भाजल्याची घटना शुक्रवारी दुपारी १वाजून १० मिनिटांनी घडली.
सिलेंडर वितरकाने सिलेंडरची डिलीव्हरी देखिल आजच केली असल्याची माहिती जखमी शुभदा यांची मुलगी अर्चना पाटणकर यांनी दिली. त्या म्हणाल्या की नेहमीप्रमाणे ८५ वर्षिय वडीलांसाठी पाणी गरम करण्याच्या हेतूने आई शुभदा यांनी गॅस गिझर लावला, तेवढ्यात त्याचा स्फोट झाल्याने ती भाजली. स्फोटाचा आवाज फार भयंकर असल्याने इमारतीमधील रहिवासी एकत्र आले. घरातील स्वयंपाकाची खोली, बेडरूम, बाथरूम आदीचे प्रचंड नुकसान झाले. अग्नीशमन दलाच्या अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सिलेंडर गच्चीत नेऊन त्याची आग विझवली, तोपर्यंत रहिवाश्यांनीच घरातील सामानाला लागलेली आग विझवली होती,तसेच काचा, खिडक्यांचा संच वेगळे करत जखमी शुभदा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक वासुदेव यांना सुरक्षित ठिकाणी नेले. चैतन्य गॅस एजन्सी मधून या ठिकाणी गॅस सिलेंडर वितरीत करण्यात आले होते. मात्र या अपघातानंतर गॅस एजन्सीकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याचा संताप रहिवाश्यांनी व्यक्त केला.
या घटनेत भाजलेल्या शुभदा यांना डोंबिवलीतील रामनगर येथील रजनीगंधा इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याचे पाटणकर यांनी सांगितले. अग्नीशमन दलाने दिलेल्या अहवालानूसार हा अपघात सिलेंडरला (ओरींग)चकती नसल्याने झाल्याचे म्हंटल्याची माहिती पाटणकर यांनी लोकमतला दिली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असेही सांगितले. घटनास्थळी मानपाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखिल आले होते, त्यांनीही पाहणी केल्याचे सांगण्यात आले. या अपघातासंदर्भात पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही. आधी जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यावर भर देण्यात आला असून पुढे काय करायचे यासाठी कुटूंबियांसमवेत चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. नगसेवक संदीप पुराणिक यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली महापलिकेची अग्निशमन यंत्रणा मात्र घटनास्थळी तातडीने आली, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनीही अपघातस्थळी भेट दिली, त्यांनी भारत गॅस च्या आपत्कालीन विभागाला संपर्क केला, परंतू तेथून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे ते म्हणाले. तसेच कंपनीचा एरिया सेल्स मॅनेजर संध्याकाळी उशिरापर्यंत आला नसल्याचे सांगण्यात आले.
* पुराणिक यांनी सांगितले की, एजन्सीच्या म्हणण्यानूसार गिझरसाठी १९ किलोचा सिलेंडर वापरण्याचा नवा नियम आहे, परंतू शुभदा यांच्या घरी १३/१४ किलोचा सिलेंडर लावण्यात आला होता, जे नियमबाह्य आहे. परंतू रहिवाश्यांच्या म्हणण्यानूसार सिलेंडर ज्या इसमाने लावला तो डिलीव्हरी बॉय हा एजन्सीचाच आहे. घरातील ज्येष्ठ नागरिकांना त्यातले काही कळलेच नाही. त्यामुळे त्या डिलीव्हरी करणा-या इसमासह व एजन्सीची ही जबाबदारी झटकून कस चालेल असे म्हणणे रहिवाश्यांचे आहे.