मॅरेथॉन स्पर्धेत धावणार २० हजार स्पर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:38 PM2019-08-09T23:38:57+5:302019-08-09T23:39:07+5:30

१८ ऑगस्टला रंगणार तिसाव्या महापौर मॅरेथॉनचा थरार : ‘रन फॉर स्मार्ट सिटी’ हे घोषवाक्य

8,000 runners in marathon competition | मॅरेथॉन स्पर्धेत धावणार २० हजार स्पर्धक

मॅरेथॉन स्पर्धेत धावणार २० हजार स्पर्धक

googlenewsNext

ठाणे : तिसावी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा १८ आॅगस्ट रोजी होणार असून या स्पर्धेत २० हजार स्पर्धक सहभागी होतील, असा अंदाज महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यंदाच्या स्पर्धेचे आकर्षण म्हणजे महिलांसाठीदेखील २१ किमीची स्पर्धा आयोजिली आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटांमध्येही स्पर्धा होणार असून किन्नर समाजदेखील यात सहभागी होणार आहे. ‘रन फॉर स्मार्ट सिटी’ या घोषवाक्याखाली ही स्पर्धा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेस उपमहापौर रमाकांत मढवी, सभापती-स्थायी समिती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, सभापती-क्रीडा समिती अमर पाटील, उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सचिव मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

१८ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ती विविध ११ गटांत घेण्यात येणार आहे. पहिल्या पाच गटांतील स्पर्धा महाराष्ट्र राज्यस्तरावर असून, पुरुष २१ किमी स्पर्धेतील विजेत्यांसाठी पहिले बक्षीस ७५ हजार, दुसरे बक्षीस ४५ हजार, तिसरे बक्षीस ३० हजार, चौथे १५ हजार अशी आहेत. त्याशिवाय, पाच ते १० पर्यंतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. स्पर्धेचा समारोपदेखील महापालिका मुख्यालयाच्या ठिकाणीच होणार आहे.

महिलांच्या १० किमी स्पर्धेसाठी पहिले बक्षीस २५ हजार, दुसरे २० हजार, तिसरे १५ हजार, चौथे १० हजार अशी असून ५ ते १० पर्यंतच्या विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे ठेवली आहे. ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. १८ वर्षांवरील १० किमी ही स्पर्धा खारीगाव ते कोपरीमार्गे महापालिका भवन अशी असणार आहे. पाचवा गट हा १८ वर्षांखालील मुलांसाठी असून ही स्पर्धा १० किमी तसेच नव्याने सुरू केलेल्या २१ किमी महिलांच्या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ७५ हजारांचे असणार आहे. जिल्ह्यासाठी मर्यादित १५ वर्षांखालील मुलांमुलींसाठी पाच किमी व १२ वर्षांखालील मुलांमुलींसाठी तीन किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. स्पर्धेची सुरुवात महापालिका भवन येथे होऊन माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक येथे संपेल. तीन किमीची स्पर्धा महापालिका भवन येथे संपेल. स्पर्धकांसाठी मोफत बससेवेची सुविधा असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही महापौरांनी केले.

ज्येष्ठ नागरिक आणि महिला, पुरुष वेगळा गट
ठाणे जिल्ह्यांसाठी मर्यादित ज्येष्ठ नागरिक ६० वर्षांवरील महिला व पुरु षासाठी वेगळा गट असून या गटातील पहिल्या पाच विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आणि मानचिन्ह देण्यात येणार आहेत. महापालिका ते बाटा शोरूम (नितीन कंपनी) अशी अर्धा किमीची ही स्पर्धा असणार आहे.

रुग्णांचाही सहभाग राहणार
याचप्रमाणे यंदाही दोन किमी रन फॉर स्मार्ट ठाणे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत महापालिका कर्मचारी तसेच पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर यांनी केले. यावर्षी महापालिकेसोबत मेडिकल पार्टनर असणारे ठाणे शहरातील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटलमधील अर्धांगवायूतून पूर्ण बरे झालेले रु ग्ण या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रेरणेतून उभारलेली त्रिदल फाउंडेशन संस्थेतील २५ ते ३० विद्यार्थीही यामध्ये सहभागी होणार आहेत. तर, यावर्षी प्रथमच किन्नर समाजदेखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे.

एकूण २२१ पंच, ९२ पायलट, २१० सुरक्षारक्षक, शेकडो स्वयंसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मेहनत घेत आहेत. या स्पर्धेसाठी महापालिकेने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या असून त्यामध्ये स्पर्धकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, स्पर्धेच्या मार्गावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवा पथके, तत्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रु ग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गावर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचार केंद्रे उपलब्ध होणार आहेत.

Web Title: 8,000 runners in marathon competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.