‘पाडळे’त ८१ कोटींचे ‘सिंचन’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:01 AM2018-08-24T01:01:35+5:302018-08-24T01:02:15+5:30
कॅनॉलसह धरणाची तत्सम कामे अपूर्णच; घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर बजेट वाढले
- नारायण जाधव
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील पाडळे धरणासह तत्सम कामे पूर्ण होण्याआधीच धरणाचा खर्च मूळ अंदाजपत्रकापेक्षा तब्बल ८० कोटी ७१ लाख रुपयांनी वाढला आहे. या वाढीव खर्चास जलसंपदा विभागाने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली मंजुरी दिली आहे.
जलसंपदा विभागाने १२ फेबु्रवारी २००३ रोजी पाडळे लघुपाटबंधारे योजनेस मान्यता दिली, तेव्हा त्याचा खर्च १३ कोटी २१ लाख गृहीत धरून त्यास प्रशासकीय मान्यता दिली. नंतर, खारभूमी विभागाने १९ जानेवारी २०१२ रोजी २००७-०८ ची दरसूची लक्षात घेऊन ४३ कोटी ४७ लाख रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मध्यंतरीच्या काळात दरसूचीत झालेला फरक, भूसंपादनात जमिनीचे वाढलेले मूल्य, संकल्पचित्रात झालेले बदल या कारणांमुळे आता त्याच्या अंदाजपत्रकात तब्बल ८० कोटी ७१ लाख रुपयांची वाढ करून ९३ कोटी ९२ लाख रुपयांच्या खर्चास द्वितीय सुधारित मान्यता दिली आहे. राज्यात सिंचन घोटाळे गाजत असतानाच पाडळे प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात तब्बल ८० कोटी ७१ लाख रुपयांची वाढ झाल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाडळे लघुपाटबंधारे प्रकल्प मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात डोंगरराजीत उभारला असून त्याखाली २१०० हेक्टर जमीन गेली आहे. त्यात हजार हेक्टर वनजमिनीचाही समावेश आहे. पाडळे, खुटरवाडी, ढेहरी आणि मिल्हे ही गावे आणि पाड्यांतील जमीन धरणाखाली गेली आहे.
स्थानिकांच्या विरोधामुळे कामे रखडली
मुरबाड तालुक्यातील पाडळे धरण प्रामुख्याने कृषी सिंचनासाठी बांधले असून परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकºयांनाही त्याचा आधार मिळणार आहे.
धरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी कॅनॉलसह इतर तत्सम कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. यात, स्थानिकांचा होणारा विरोध हे एक प्रमुख कारण आहे.
कॅनॉलची कामे अपूर्ण असल्याने सध्या तरी पाणी असून शेतकºयांना या धरणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे सध्या धरणाचा मासेमारीव्यतिरिक्त अन्य उपयोग होत नाही. सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने येथे दुर्घटनाही घडत आहेत.