८ महिन्यात ८२ स्कूल वाहनांचे परवाने रद्द
By admin | Published: January 9, 2017 06:07 AM2017-01-09T06:07:05+5:302017-01-09T06:07:05+5:30
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण आरटीओ कार्यालयाने आठ
मुरलीधर भवार / कल्याण
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण आरटीओ कार्यालयाने आठ महिन्यांत ८२ वाहनांची नोंदणी रद्द केली. त्यांचा शालेय वाहतुकीचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, वाहनांना पिवळा रंग, तपकिरी रंगाची पट्टी तसेच शाळेच्या नावाचा उल्लेख असणे बंधनकारक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी रॅक, तर आसनावर बसल्यावर धरण्यासाठी हॅण्डल हवे. पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनात महिला अटेंडण्ट हवी. प्रथमोपचारपेटी, आगरोधक यंत्रणा हवी. वाहनचालकास पाच वर्षांचा अनुभव हवा. बसला लहान विद्यार्थ्यांकरिता चढण्याकरिता सोयीची पायरी हवी. शालेय विद्यार्थी वाहतुकीची सुरक्षितता जोपासण्यासाठी कल्याण आरटीओ कार्यालयाने एप्रिल ते डिसेंबर २०१६ दरम्यान २७७ शालेय वाहनांची तपासणी केली. त्यापैकी ८२ वाहनांमध्ये उपरोक्त नियमावलीतील अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द केली आहे. तसेच त्यांच्याकडून ११ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई आरटीओ कार्यालयाने कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर परिसरात केली आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रात शालेय वाहनांची संख्या एक हजार ५०० इतकी आहे.