घोडबंदर खिंडीतील महामार्ग रुंदिकरण व नविन रस्त्यासाठी तब्बल ८२३ झाडांची होणार कत्तल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 12:57 PM2018-01-10T12:57:09+5:302018-01-10T12:58:35+5:30
मुंबई - अहमदाबाद महामार्गाचे घोडबंदर खिंडीतील सुमारे दिड कि.मी. रस्त्याचे रुंदिकरणात ६४७ तर वरसावे येथील प्रस्तावित खाडी पुलाकडे जाण्यासाठीच्या मार्गावरील १७६ अशा तब्बल ८२३ झाडांची तोड केली जाणार आहे.
धीरज परब
मीरारोड : मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे घोडबंदर खिंडीतील सुमारे दिड कि.मी. रस्त्याचे रुंदिकरणात ६४७ तर वरसावे येथील प्रस्तावित खाडी पुलाकडे जाण्यासाठीच्या मार्गावरील १७६ अशा तब्बल ८२३ झाडांची तोड केली जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिके कडे राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने दिल्या नंतर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने झाडांची संख्या न टाकता त्यास मंजुरी दिली आहे. तर वनविभागाच्या हद्दीतील ६४७ झाडं काढण्यासाठीची बाब वनखात्या कडे वर्ग करणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. झाड्यांच्या तोडी सह खिंडीच्या रुंदिकरणा मुळे या भागात वावरणारया बिबट्यांच्या जीवावर संक्रांत येण्याची भिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी ११ जानेवारी रोजी दुपारी मीरारोड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वरसावे येथील खाडीवर नविन पाचपदरी पुलाचे , वरसावे जंक्शन येथील अंडरपास, महामार्गा वरील घोडबंदर खिंडीचे रस्ता रुंदिकरण, सम्राट हॉटेल जवळ अंडरपास तर लक्ष्मी बाग येथे पादचारी पुल आदी कामांचे भुमिपुजन केले जाणार आहे.
घोडबंदर खिंड ही वन विभागाच्या अखत्यारीत असुन संरक्षित वन आहे. या ठिकाणी सद्याच्या असलेल्या महामार्गा वरुन देखील बिबटे ये जा करतात. काही महिन्या आधीच पहाटेच्या वेळी भरधाव वाहनाने खिंडीत एका बिबट्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यु झाला होता. आजही घोडबंदर गावात व परिसरात बिबटे व त्यांची पिल्लं आढळुन येतात. घोडबंदर किल्लयातील पुरातन टाकीत बिबट्याची पिल्लं पडली होती.
वन विभागाने देखील खिंडीत बिबट्यांचा वावर असल्याने वाहनं जपुन चालवण्याचा इशारा देणारे फलक लावले आहेत. पण त्याचे पालन खिंडीत कोणीच वाहन चालक करत नाही. सद्या चौपदरी असलेला हा मार्ग ६ पदरी केल्यावर तर वाहनांच्या वेगावर कुठलेही नियंत्रणच राहणार नाही. जेणे करुन या भागातुन होणारा बिबट्यांचा वावर हा त्यांच्या जीवावर बेतण्याची भिती निर्माण झाली आहे.
बिबट्यांसह विविध पशु - पक्षींचा या भागातील वावर देखील नामशेष होणार आहे. रुंदिकरणा मुळे येथील डोंगर आणखी फोडावा लागणार आहे. शिवाय दोन्ही बाजु कडील तब्बल ६४७ झाडांची कत्तल करावी लागणार आहे.
तर वरसावे येथे खाडी पुला पर्यंत जाणारया मार्गा साठी देखील १७६ झाडांची तोड केली जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने ६४७ व १७६ अशी मिळुन तब्बल ८३२ झाडांची तोड करण्यासाठी परवानगी मागीतली होती. नुकत्याच झालेल्या वृक्षप्राधिकरण समिती मध्ये सदस्यांनी पाहणी करण्याचा आग्रह धरतानाच झाडांचे पुर्नरोपण करा अशी भुमिका घेतली. तसे असले तरी झाडांची संख्या न टाकता समितीने झाडं काढण्यास परवानगी देऊन टाकली आहे.
त्यामुळे ८२३ झाडांवर कुरहाड चालवण्याचा मार्ग आणखी सुकर झालाय. शिवाय येथील बिबट्यां सह वन्य जीवांवर देखील रुंदिकरण बेतणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
समिती मध्ये झाडं काढण्यास तसेच पुर्नरोपण करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी त्याची पाहणी केली जाणार आहे. पालिकेच्या हद्दीतील झाडं काढताना एकाच्या बदल्यात ५ झाडांची लागवड करुन घ्यावी असा निर्णय घेण्यात आलाय. तर वन विभागाच्या अखत्यारीतील ६४७ झाडं काढण्याचा विषय वन विभागा कडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगीतले.