आठ महिन्यांत ८३ दुर्घटना; जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:44 AM2018-03-15T03:44:03+5:302018-03-15T03:44:03+5:30
रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या.
- सुरेश लोखंडे
ठाणे : रासायनिक स्फोटांसह गोडाऊनला लागेल्या आगी, गॅस गळती, वीज पडून झालेल्या दुर्घटना, नाल्यात व नदीत पडून मृत्यूसह इमारत दुर्घटनांची मालिका लक्षात घेता जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ८३ दुर्दैवी घटना घडल्या. या दुर्दैवी घटनांमध्ये सुमारे ४८ निष्पाप जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. तर रविवारी खडवलीच्या नदीत तीन बुडाले असता त्यातील एकाचे शव मिळाले असून दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.
खडवलीजवळून वाहत असलेल्या भातसा नदी पात्रात रविवारी तिघे बुडाले. त्या पाठोपाठ उन्हासनदीपात्रात दोघे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या जीव घेण्या घटनांमध्ये निष्पाप जीव जात आहेत. या आधी मागील आठमहिन्याच्या कालावधीत ८३ जीव घेण्या घटना घडल्या त्यात ४८ जणांचा मृत्यू झाला. यातील नैसर्गिक घटना वगळता अन्य घटना ह्या निष्काळजी व दुर्लक्षितपणाच्या आहेत. यामध्ये दुरांतो एक्स्प्रेसच्या दुर्दैवी घटनेप्रमाणेच लागलेल्या आगी, इमारतींच्या दुर्घटना, गॅस गळती, भंगारच्या दुकास लागलेल्या आगी, डम्पिंगच्या आगीमुळे निघत असलेला जीवघेणा धूर, त्यामुळे गुदमरण्याच्या घटनांनी जिल्ह्यातील नागरिक हैराण आहेत.
निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या केवळ तीन महिन्यात २४ घटना घडल्या. यात सर्वाधिक १२ घटना आगीच्या आहेत. यामध्ये ओवळा येथील गोडाऊन, तुर्भेतील केमिकल कंपनी, उल्हासनगरची फर्निचर कंपनी, भिवंडीचे वळपाडासह काल्हेर, सोनाळे येथील गोडाऊन, कृष्णा कम्पाउंड, कृपा इंडस्टीज, पडघा येथील गवत, मानकोली, ऐरोली,शहाड गावठाण, ठाणेची खारकर आळी आदी ठिकाणी नुकत्याच आगीच्या घटना घडल्या उर्वरित अन्य घटनांमध्ये चार निष्पाप लोकांचा बळी गेला. तर आठरा जण गंभीर जखमी आहेत. नैसर्गिक दुर्घनेत वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला. तर नाल्यात वाहून गेल्यासह नदीत बुडालेले, स्लॅब कोसळून, भींत पडून, पर्यटन स्थळी घसरून, नदीत वाहून आदी दुर्दैवी घटनांमध्ये ३२ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. याशिवाय ६९ जण गंभीररित्या जखमी झाले.
>रासायनिक दुर्घटना रोखणाऱ्या उपाययोजनांची गरज
रासायनिक स्फोटांमुळे झालेल्या आगींची संख्या जिल्ह्यात अधिक आहेत. या रासायनिक दुर्घनांमध्ये अंबरनाथ येथील फॉरेस्टनाक्याजवळील केमीकल कंपनीची दुर्घटना, घोडबंदर रोडवर केमिकलचे बीपीसीएलच्या टँकरचा अपघात, भिवंडीचे जयश्री कम्पाउंडची केमीकलचे गोडाऊन, नारपोलीची डार्इंग मशीन आग, सुधीर शेट केमिकल्स कंपनीची आग, मानकोलीच्या इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या गोडावूनची आग आदी रासायनिक कंपन्या व त्यांच्या निष्कळजीपणातून झालेल्या घटना ठाणे जिल्ह्यास घातक आहे. या रासायनिक घटनांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कंपन्यांवर कडक कारवाईची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.