ठाणे महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ८३.८४ टक्के; गतवर्षी लागला होता ७०.५७ टक्के निकाल
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 27, 2024 06:29 PM2024-05-27T18:29:33+5:302024-05-27T18:30:20+5:30
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ठाणे :मार्च - २०२४मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत ठाणे महापालिकेच्या २२ माध्यमिक शाळांचा निकाल ८३.८४ टक्के लागला आहे. गतवर्षी हे प्रमाण ७०.५७ टक्के एवढे होते. तर, या वर्षी महापालिकेच्या तीन माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षी एका शाळेचा निकाल १०० टक्के लागला होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा ठाणे महापालिकेच्या शाळांमधून १५२३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळा क्रमांक १२, कौसा येथील मराठी माध्यमाची शाळा, शाळा क्रमाक १९, सावरकर नगर ही उर्दू माध्यमाची शाळा, तसेच, शाळा क्रमांक १६, सावरकरनगर ही इंग्रजी माध्यमाची शाळा यांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार यांनी दिली.
त्याचबरोबर, महापालिकेच्या आठ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. तर, मराठी माध्यमाचा (१३ शाळा) एकूण निकाल ७३.४० टक्के लागला आहे. त्यातील मानपाडा आणि घोलाईनगर येथील रात्र शाळांचे एकूण १७ पैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू माध्यमाचा (०४ शाळा) निकाल ९१.४४ टक्के, इंग्रजी माध्यमाचा (०४ शाळा) निकाल ९६.९६ टक्के आणि हिंदी माध्यमाचा (०१ शाळा) निकाल ८७.५० टक्के लागला आहे.