मीरा भाईंदर महापालिकेतील ८४ संस्थानिक शिक्षकांवर अखेर बदलीचा बडगा

By धीरज परब | Published: September 22, 2022 01:04 PM2022-09-22T13:04:52+5:302022-09-22T13:05:10+5:30

एकाच शाळेत १० वर्षांपासून ते तब्बल ३३ वर्ष होते ठाण मांडून होते

84 institutional teachers of Mira Bhayander Municipal Corporation have finally been transferred | मीरा भाईंदर महापालिकेतील ८४ संस्थानिक शिक्षकांवर अखेर बदलीचा बडगा

मीरा भाईंदर महापालिकेतील ८४ संस्थानिक शिक्षकांवर अखेर बदलीचा बडगा

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळां मध्ये १० वर्षां पासून ते तब्बल ३३ वर्ष एका एका शाळेतच संस्थानिक म्हणून कायम असलेल्या ८४ शिक्षकांवर आयुक्त दिलीप ढोले यांनी बुधवार २१ सप्टेंबर रोजी बदलीचा बडगा उगारला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आदी माध्यमांच्या ३६ शाळा आहेत. सध्या ह्या शाळांमध्ये १५३ शिक्षक कायम स्वरूपी सेवेत काम करत आहेत. शिक्षकांना चांगला पगार मिळत असताना व पगारवाढ होत असताना दुसरीकडे महापालिका शाळांच्या शिक्षणाचा दर्जा मात्र वर्षा गणिक खालावत चालला आहे. जेणे करून पालिका शाळां मधील पटसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. शिक्षणाचा दर्जा, आवश्यक सोयीसुविधा व उपक्रम ह्या वरून महापालिका आणि माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी नेहमीच टीकेचे धनी ठरलेले आहेत. 

आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सातत्याने आढावा, प्रशिक्षण व उपाय योजना चालवल्या असून पालिकेचे पथक नुकतेच दिल्ली सरकारच्या शाळांची पाहणी करण्यासाठी पाठवले होते. त्या अनुषंगाने आयुक्तांनी विविध उपाययोजना अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. अनेक शिक्षक वर्षा न वर्ष एकाच शाळांमध्ये ठाण मांडून असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त संजय दोंदे यांना आढावा घेऊन माहिती सादर करण्यास सांगितली होती. दोंदे यांनी या बाबत माहिती गोळा करून त्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे व उपायुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त ढोले यांना सादर केला होता. 

पालिका शाळेतील १५३ शिक्षकांपैकी तब्बल ८४ शिक्षक हे एकाच शाळेत १० वर्ष व त्यापेक्षा जास्त काळ तळ ठोकून असल्याचे आढळून आले. हिंदी माध्यमाचे शिक्षक कैलाशनाथ रामकिशन माली हे तर तब्बल ३३ वर्षां पासून शाळा क्र. १८ मध्येच संस्थानिक प्रमाणेच कायम असल्याचे सापडले . हिंदी माध्यमाच्या नवघर शाळा क्र. २९ मधील शिक्षिका लुईजा जेम्स डाबरे ह्या तब्बल २६ वर्षां पासून त्याच शाळेत आहेत . हिंदी माध्यमातीलच नीलम शैलेंद्र सिंह व  सीमा सुरेंद्रनाथ प्रजापती ह्या शाळा क्र . १८ मध्ये तर साखला लक्ष्मीदयाल भौरेलाल ह्या नवघर शाळा क्र . २९ मध्ये तब्बल २४ वर्षां पासून एकाच शाळेत ठाण मांडून आहेत . राजकुमार रामजी निगम हे हिंदी शाळा क्र . १८ मध्ये तब्बल १९ वर्षां पासून आपले बस्तान मांडून आहेत. 

आयुक्तांनी ह्याची गंभीर दखल घेत ह्या ८४ शिक्षकांची अन्य शाळां मध्ये बदली केली असून तसे आदेश बुधवारी जारी केले आहेत . शिक्षकांनी बदलीच्या ठिकाणी २४ तासाच्या आत हजर होऊन तसा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे . बदली आदेशा नंतर परस्पर रजेवर गेल्यास अनधिकृत गैरहजेरी ग्राह्य धरण्यात येणार आहे . बदली रोखण्यासाठी राजकीय वा बाह्य दबाव आणल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम नुसार शिस्तभंगाची कारवाईचा इशारा आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला आहे. एरव्ही सरकारी नियमा नुसार ३ वर्षा पर्यंत एकाच पदावर काम केल्या नंतर बदली करणे अपेक्षित असते . परंतु महापालिका शाळां मधील हे शिक्षक १० वर्षां पासून तब्बल ३३ वर्षां पर्यंत एकाच ठिकाणी तळ ठोकून असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे . तर या आधी काहींची बदली केली असता लोकप्रतिनिधी वा राजकीय दबाव आणून बदल्या रद्द केल्या गेल्याचे प्रकार चर्चेत आले आहेत . 

Web Title: 84 institutional teachers of Mira Bhayander Municipal Corporation have finally been transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.