८४ वर्षांच्या ‘लखोबा लोखंडे’ला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:23 AM2017-10-18T04:23:58+5:302017-10-18T04:24:11+5:30
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ४४ वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख ७८ हजार रुपये उकळणा-या ८४ वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामट्याला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ४४ वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख ७८ हजार रुपये उकळणा-या ८४ वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामट्याला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पुण्याच्या चिंचवड (मूळ रा. राधाकृष्ण कॉलनी, जळगाव) भागात राहणा-या या भामट्याने ठाण्याच्या शिवाजीनगर भागातील या महिलेला ४ फेब्रुवारी २०१६पासून लग्नाचे आमिष दाखवले. चिटणीस याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वास्तव्याला असलेल्या स्वाती राणे (५५) या महिलेच्या मदतीने तिच्याकडून ७० हजारांची रोकड घेतली. तसेच वेगवेगळ्या कारणांसाठी तिच्या बँक खात्यातूनही तीन लाख ३८ हजारांची रक्कम काढली. तिच्या भावाकडूनही चार लाखांची रक्कम उकळली. वारंवार मागणी करूनही चिटणीस पैसे परत करत नाही किंवा लग्नाचेही नाव काढत नसल्याने या भामट्याविरुद्ध तिने अखेर २८ सप्टेंबर २०१७ रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आणि उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने त्याला पुण्यातून अटक केली आहे. त्याला २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
कोरे धनादेश घेऊन केली फसवणूक
आपण ५५ वर्षीय असल्याचे भासवून शिवचंद्रने ठाण्यातील या महिलेकडून १७ कोरे धनादेश स्वाक्षरी करून घेतले. त्याने ते स्वाती राणे हिला वेगवेगळ्या खरेदीसाठी आणि लघुउद्योगासाठी दिले. या धनादेशांद्वारे त्याने ३ लाख ३८ हजार ६९ रुपयांची खरेदीही केली. तिच्या नातेवाइकांकडूनही प्रत्येकी ७० हजार असे १ लाख ४० हजार तसेच तिच्या भावाकडून ४ लाख रुपये घेतले. यातूनच त्याने पवई येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे घर खरेदीसाठी १८ लाख ७० हजार रुपये भरल्याची बनावट पावती तिला दाखविली.
यापूर्वीचे गुन्हे
पुण्याच्या पिंपरीतील विजय वराडे यांनाही इलेक्ट्रीक रिसर्च सेंटरचे टेंडर काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून चिटणीसने २ लाख रुपये घेतले होते. या प्रकरणीही १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मुंबई, वाकोला येथील उज्ज्वला जगदाळे यांच्याकडून चिटणीस आणि स्वाती राणे यांनी खारघर येथे घर घेऊन देण्याच्या नावाखाली २६ लाख उकळले.