ठाण्यात ८५ तासांचे कविसंमेलन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:34 AM2019-02-27T00:34:08+5:302019-02-27T00:34:46+5:30

१८ एप्रिलला उद्घाटन : एक हजार कवींचा सहभाग

85 hours of poetry will be held in Thane | ठाण्यात ८५ तासांचे कविसंमेलन होणार

ठाण्यात ८५ तासांचे कविसंमेलन होणार

Next

- जान्हवी मोर्ये ।
लोकमत न्यूज नेटवर्क


डोंबिवली : अखिल भारतीय कला-क्रीडा व सांस्कृतिक अकादमी यांच्यातर्फे ८५ तास चालणारे एक कविसंमेलन एप्रिलमध्ये ठाण्यात होणार आहे. या कविसंमेलनात राज्यातील १००० कवी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाची नोंद ‘डायमंड बुक आॅफ रेकार्ड’ आणि ‘लिम्का बुक आॅफ रेकार्ड’मध्ये व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयोजक हेमंत नेहते यांनी सांगितले.


मराठी भाषा दिन केवळ एक दिवसापुरता साजरा होतो. पण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. मराठी भाषेतील साहित्याचे वाचन झाले पाहिजे. त्यासाठी अशा स्पर्धा घेण्याची गरज आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धक दहा पुस्तके वाचतील आणि त्यातून मराठी साहित्याचा प्रचार होण्यास मदत होणार आहे. मराठी साहित्याचा प्रसार झाला की मराठी भाषा टिकून राहणार आहे.

यंदाचे वर्ष हे गदिमा यांच्या जन्म शताब्दीचे आणि राम गणेश गडकरी यांच्या स्मृती शताब्दीचे आहे, तसेच विंदाची १०१ व्या जयंतीचे वर्ष असल्याने त्यांना आदरांजली वाहण्याच्या हेतूने आणि तळागाळातील लोकांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने ‘पोएट्री मॅरेथॉन एक काव्यमहोत्सव’ हे कविसंमेलन होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन १८ एप्रिलला ठाण्यात होणार आहे. ते सलग ८५ तास चालणार आहे. हे संमेलन २१ एप्रिलला रात्रीपर्यंत सुरू राहील. या संमेलनात स्वरचित आणि नामांकित कवींच्या कविता वाचता येणार आहेत. साहित्याचे वाचन व्हावे हा यामागे हेतू असल्याने स्वरचित कविता असावी ही मर्यादा ठेवण्यात आली नाही. एक हजार कविता एकत्र सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संमेलनासाठी योगेश जोशी, हेमंत नेहेते आणि डॉ. राज परब यांनी पुढाकार घेतला आहे.


योगेश जोशी म्हणाले, या स्पर्धेसाठी ४० प्रमुख पाहुणे, ४० सूत्रसंचालक असणार आहेत. ४० गु्रपला वेळ ठरवून देण्यात आली आहे. एका गु्रपला साधारणपणे दोन तासांची वेळ दिली आहे.


एक गु्रपमध्ये लहान व मोठी कवितेनुसार वेळ दिला आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कविवर्य अशोक नायगावकर, डॉ. विजया वाड, ज्येष्ठ कवी महेश केळुस्कर, शशिकांत तिरोडकर, डॉ. मधुसूदन घाणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी ७० तासांचा विक्रम
डायमंड बुक आॅफ रेकार्डसाठी यापूर्वी ७० तासांचा विक्रम नोंदविला गेला आहे. या कविसंमेलनाची नोंद डायमंड बुकसोबतच लिम्का बुकमध्येही व्हावी, असा आयोजकांचा प्रयत्न असल्याने ८५ तासांच्या संमेलनासाठी प्रयत्न होणार आहेत. दोन दिवसांत १२५ जणांनी नावाची नोंद या संमेलनासाठी केली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: 85 hours of poetry will be held in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.