पालघरच्या जव्हार-मोखाड्यात आढळली ८७३ कुपोषित बालके; आराेग्य विभागाचा दावा फाेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 08:05 AM2024-01-25T08:05:10+5:302024-01-25T08:05:17+5:30

अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका

873 malnourished children were found in Jawhar-Mokhadya of Palghar | पालघरच्या जव्हार-मोखाड्यात आढळली ८७३ कुपोषित बालके; आराेग्य विभागाचा दावा फाेल

पालघरच्या जव्हार-मोखाड्यात आढळली ८७३ कुपोषित बालके; आराेग्य विभागाचा दावा फाेल

जव्हार : आरोग्यसेवेवर कोट्यवधी खर्च, कुपोषणावर मात करण्यासाठी विविध योजना, दरवर्षी कागदावर नेमला जाणारा टास्क फोर्स अशा एकना अनेक घोषणा करूनही कुपोषणमुक्त पालघर जिल्हा करण्याचा दावा फोल ठरला आहे. जव्हार आणि मोखाडा तालुक्यात गेल्या महिन्यात अतितीव्र ७०, तर तीव्र ८०३ कुपोषित बालके आढळली आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर असल्याने कुपोषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. याचा परिणाम जव्हार-मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागात होत आहे. पोषण आहारामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी-अधिक होते, मात्र मागच्या काही काळात हा आकडा फुलला असून, सेविकांच्या संपाचासुद्धा यावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

मोखाडा तालुक्यात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या २४, तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १५० वर पोहोचली आहे. याचप्रमाणे जव्हार तालुक्यातील अतितीव्र बालकांची संख्या ४६ आणि तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या तब्बल ६५३ आहे. मोखाडा आणि जव्हार तालुक्यात आजघडीला आरोग्यावर शासन यंत्रणेबरोबरच अनेक खासगी संस्थाही काम करत आहेत. याचबरोबर दररोज अनेक योजनांचा पाऊस पडत आहे. मात्र, या महिनाभराच्या आकडेवारीने शासनाचा कुपोषणमुक्तीचा दावा किती फोल आहे? हे प्रत्यक्ष सरकारी आकडेवारीतून समोर येत आहे.

उपचारांअभावी अनेकांचा मृत्यू 
वर्षभराआधी तालुक्यातील मरकटवाडी येथील गर्भवतीला दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून बालकाचा मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी वेळेवर बस नसल्याने गर्भवती दुचाकीवरून पडून मृत्युमुखी पडली, तर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नाशिक जिल्हा रुग्णालय असा प्रवास करूनही रूपालीचा बाळासह मृत्यू झाला. त्यातच आता पुन्हा कुपोषणाचे दुष्टचक्र सुरू होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 873 malnourished children were found in Jawhar-Mokhadya of Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.