जिल्ह्यातील ८८० विधवा संजय गांधी योजनेच्या लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:45 AM2021-09-12T04:45:54+5:302021-09-12T04:45:54+5:30
ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्यातील ९४५ महिलांचे पती दगावल्याची माहिती संकलित केली आहे. यापैकी ६६ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा ...
ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्यातील ९४५ महिलांचे पती दगावल्याची माहिती संकलित केली आहे. यापैकी ६६ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ८८० महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तातडीने पूर्तता करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे गुरुवारी संबंधित प्रशासनाला दिले.
कोरोनामुळे एकल, विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय कृती समितीची चौथी बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.
ठिकठिकाणच्या प्रशासनाकडून या महिलांची माहिती जिल्हा प्रशासन संकरित करीत आहे. त्यांच्या उदनिर्वाहाच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देऊन एमआयडीसीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी त्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या महिलांना स्वयंपूर्ण, सक्षम करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. याद्वारे या महिला स्वतः काम करून घर चालवू शकतील. तसेच त्यांना रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीमधील विविध कंपन्यांशी संपर्क साधून योजना तयार करावी, असेही ठोंबरे म्हणाले.
यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, उल्हानगर महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रियंका राजपूत, उपशिक्षणाधिकारी ललिता कवडे, सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव, आदींसह तहसीलदार सुरेंद्र ठाकूर, महिला व बालकल्याण अधिकारी संजय खंडागळे, बालविकास प्रकल्प अधिकारी अशोक बागुल यांच्यासह महानगरपालिका, पोलीस, जिल्हा परिषद, आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
------------